
Ashadhi Ekadashi 2022 : भेटी लागी जीवा, लागलीसे आस!
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पंढरपूरचा आषाढी एकादशीचा सोहळा पारंपरिक उत्साहात होणार आहे. त्यासाठी मंगळवार (ता. २८)पासून जिल्ह्यातील पायी दिंड्या रवाना होतील. जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी पंढरपूरला १२५ हून अधिक पायी दिंड्या रवाना होतात. मात्र, कोरोनामुळे गेली दोन वर्षे वारकऱ्यांनी आपापल्या गावातच या पायी दिंडीचा प्रतीकात्मक सोहळा अनुभवला. यंदा कोणतेच निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात पायी दिंड्या रवाना होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निसर्गानेच पायी वारी न करण्याची आज्ञा दिली आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात विठ्ठल आहे, अशा भावनेतून येथील दोन वर्षे आपापल्या गावातच थांबून कोरोनाच्या विरोधातील लढाईला बळ दिले.
यंदा गेल्या महिन्यापासूनच वारीच्या तयारीला प्रारंभ झाला. कालपासून देहू आणि आळंदीतून वारीत सहभागी होणारे भाविक रवाना झाले. आता आपापल्या गावातून पायी दिंड्यांना २८ जूनपासून प्रारंभ होणार असून, प्रत्येक वर्षीच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्क्यांहून अधिक वारकऱ्यांचा सहभाग वाढणार आहे, असे एकूणच नियोजनावरून स्पष्ट झाले आहे. २८ जूनला सौंदलगा, कागल परिसरातून पायी दिंड्यांचे प्रस्थान होईल. २९ जूनला येवती, म्हाळुंगे, निगवे खालसा परिसरातील, तर तीस जूनला चुये, मरळी आणि पन्हाळा तालुक्यातील दिंड्यांचे प्रस्थान होईल. एक जुलैपासून शहरातील उत्तरेश्वर, कुंभार मंडप, शनिवार मंडपासह फुलेवाडी, कसबा बावडा आदी ठिकाणांहून पायी दिंड्यांचे प्रस्थान होईल.
तरुणाईचा वाढता सहभाग
कोल्हापूरच्या वारकरी संप्रदायाचा विचार केला तर सलग सात ते आठ दशकं पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही मोठी आहे. एकाच दिंडीतून घरातील तीन पिढ्यांनी पायी वारी करणाऱ्या कुटुंबांची संख्याही लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षांत तरुणाईचा वारीतील सहभाग वाढला असून, यंदाही हे प्रमाण आणखी वाढेल.
Web Title: Ashadhi Ekadashi 2022 See You Soon Come
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..