esakal | Kolhapur : ऐतिहासिक देखाव्यातून प्रबोधनाची वाट
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur : ऐतिहासिक देखाव्यातून प्रबोधनाची वाट

Kolhapur : ऐतिहासिक देखाव्यातून प्रबोधनाची वाट

sakal_logo
By
युवराज पाटील

कपिलतीर्थ मंडईजवळील मित्र प्रेम मंडळ हे नाव कानावर पडले की, डोळ्यांसमोर उभे राहतात ऐतिहासिक सजीव देखावे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास देखाव्याच्या माध्यमातून उभ्या करणाऱ्या मंडळाने आतापर्यंत विक्रमी गर्दी खेचली आहे. अंगावर रोमांच उभे करणारे देखावे कायमस्वरूपी डोळ्यांत साठवावेत असे असतात. गणेशोत्सवाला सामाजिक उपक्रमांची मंडळाने जोड दिली आहे.

मंडळाला ‘मित्र प्रेम’ हे नाव का पडले याचा मजेदार किस्सा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी जाधव सांगतात. ते म्हणाले की, १९७७ ला मंडळाची स्थापना झाली. चौकात गाड्या रिव्हर्स घेतल्या जात असल्याने रिव्हर्स तरुण मंडळ असे नाव असावे, असा विचार त्यावेळी पुढे आला. याच परिसरात ज्येष्ठ गृहस्थ सांगलीकर यांना मात्र हे नाव पसंत पडले नाही. नंतर मित्र प्रेम असा शब्द पुढे आला. त्यावेळी सर्वांनाच हे नाव आवडले. सध्याचा रिक्षा थांबा आहे तो सन्मान हॉटेलच्या दारात होता. शेकापचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत इंगवले यांच्या पुढाकारातून रिक्षा थांबा मित्र प्रेम मंडळाच्या जवळ आणला गेला. १९९५ ला शिवसेनेचा आमदार करण्यात मित्र प्रेमचाच वाटा होता.

ही झाली मंडळाची ओळख. संकट कोणतेही असो, त्यावेळी जी मदत लागेल ती करण्याची मंडळाची तयारी असते. गणवेश वाटपापासून ते पूरग्रस्तांना मदत दिली गेली; मात्र त्याचा कोठेही गाजावाजा झाला नाही. अनाथ मुलांच्या पाठीशी मंडळ कायम राहिले आहे. भाजीवाले, रिक्षाचालक तसेच सामाजिक कामाची आवड असलेल्या कार्यकर्त्यांकडून मंडळाची परंपरा जोपासली जात आहे.

सजीव देखाव्यांची तयारी करणे ही सोपी गोष्ट नाही. स्क्रीप्ट लिहिणे, ती तज्ज्ञांना दाखविणे, कलाकारांची बेजमी करणे याची पूर्वतयारी उत्सवाच्या किमान महिनाभर करावी लागते. गणेशोत्सव काळात मित्र प्रेमचा देखावा म्हटले की, अनेकांसाठी ती पर्वणी ठरते. अंगावर काटा उभे करणारे संवाद, कलाकारांचा हजरजबाबपणा आणि शेवटी देखाव्यातून दिला जाणारा संदेश महत्त्वाचा ठरतो. एक गर्दी मागे सरते तोपर्यंत दुसरे प्रेक्षक देखावा पाहण्यासाठी तयार असतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचाही देखावा असाच गाजला होता. राष्ट्रपुरुषांच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. कोविडमुळे सजीव देखाव्याला मर्यादा आल्या तरी या संकटातून लवकर बाहेर पडून पुन्हा लोकांसमोर येण्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.

loading image
go to top