esakal | `बेड फुल्ल~... कुठल्या शासकीय रुग्णालयात सुरू आहे रुग्णांच्या जीवाशी खेळ........वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

0

ते, रात्री साडेअकरा वाजता सीपीआरमध्ये गेले. ऑक्‍सिजन बेड कक्षात 21 बेड रिकामे असल्याचे दिसून आले.

`बेड फुल्ल~... कुठल्या शासकीय रुग्णालयात सुरू आहे रुग्णांच्या जीवाशी खेळ........वाचा सविस्तर

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : कोल्हापुरातील सीपीआर या शासकीय रुग्णालयाधील 300 बेड कागदोपत्री फुल्ल आहेत. त्या आधारावर केवळ बेड शिल्लक नाहीत, असे उत्तर देत अनेक कोरोनाबाधितांना उपचाराला घेणेच टाळले जात आहे. जादा काम टाळण्यासाठी पळवाटा काढल्याचे प्रकार सीपीआरमध्ये घडत असल्याचे दिसते. परिणामी गंभीर रुग्णाला सीपीआरमध्ये टाचा घासण्याची वेळ येत आहे. यावर सीपीआर प्रशासन मात्र वेगवेगळी उत्तरे देत दिशाभूल करत आहे. 

या संदर्भात सीपीआरची बाजू जाणून घेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""सीपीआरमध्ये बेडची व्यवस्था पुरेशी आहे. स्त्री व पुरुषासाठी स्वतंत्र ऑक्‍सिजन बेड आहेत. ऑक्‍सिजनपुरवठ्याची सुविधाही सुरू होत आहे.'' एवढेच सांगून त्यांनी पुढील प्रश्‍नांबाबत बोलणेच टाळले.

पाच महिन्यांपासून सीपीआर पूर्ण वेळ कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर येथे उपचार होतात. कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. सौम्य लक्षणे, तीव्र लक्षणे व गंभीर असे रुग्णांचे वर्गीकरण आहे. सौम्य लक्षणे असलेले बाधित उपचारानंतर बरे होतात. त्यांना दहाव्या दिवशी होम क्वारंटाईनच्या शासनाच्या सूचना आहेत. यातील बहुतेकांचा दुसरा स्वॅब घेण्यास विलंब लावणे, अहवाल देण्यास विलंब लावला जातो. अशा रुग्णाला 14 ते 18 दिवस दाखल करून ठेवले जाते. त्याचे बेड वेळीच रिकामे झाले तर सीपीआरमध्ये येणाऱ्या गंभीर बाधितांवर उपचार करावे लागतील. सर्व यंत्रणा कामाला लागेल, अशा मानसिकतेतून हा कालावधी वाढविण्याच डाव केला जातो का, असा प्रश्‍न रुग्णांतून विचारला जात आहे. सीपीआरमधील अनेक विभागप्रमुख नियमतिपणे राऊंड घेत नाहीत. दिवसातून एका-दोन वेळा डॉक्‍टर वॉर्डात येऊन जातात, मात्र ते प्रशिक्षणार्थी आहेत, विभागप्रमुख आहेत की, अन्य कोण आहेत, याविषयी संभ्रम आहे. 

21 बेड रिकामे आढळले : सातपुते
कोरोनाचा त्रास होत असल्याने पुतण्याला ऑक्‍सिजन बेड शोधण्यासाठी धावपळ केली. सर्वत्र बेड नसल्याचेच उत्तर मिळाले. आरोग्य अधिकाऱ्यांनाही विनंत्या केल्या. अखेर आमदार पी. एन. पाटील यांनी दूरध्वनी केल्यानंतर सीपीआरमध्ये ऑक्‍सिजन बेड मिळाला, मात्र येथे प्रवेश केल्यानंतर हॉलमधील 21 ऑक्‍सिजन बेड रिकामेच असल्याचे पाहून धक्‍का बसला. शासकीय रुग्णालयातच बेड नसल्याचे सांगितले जात असेल, तर सर्वसामान्य रुग्णांनी जायचे कुठे, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. 

श्री. सातपुते म्हणाले, ""गुरुवारी (ता. 13) बहिरेश्‍वर (ता. करवीर) येथे राहत असलेल्या पुतण्यास ताप व सर्दीचा त्रास होत असल्याने सीपीआरमध्ये स्वॅब दिला. स्वॅबचा अहवाल दुसऱ्या दिवशी मिळाला नाही. चौकशी केली असता कोणत्याच नोंदी मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा आयसोलेशनमध्ये स्वॅब देण्याचा निर्णय घेतला, मात्र आयसोलेशनला कार्टेज नसल्याने केआयटी येथे एक चाचणी केली. दरम्यान, रुग्णाला अधिकच त्रास होत असल्याने ऑक्‍सिजन बेड शोधण्याची सूचना डॉक्‍टरनी दिली.'' 
ते म्हणाले, ""जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी शोधाशोध करून ताराबाई पार्क येथे ऑक्‍सिजनचा बेड उपलब्ध केला. मात्र, केआयटी येथून रुग्ण येईपर्यंत हा बेडही आरक्षित झाला. पुन्हा अधिकाऱ्यांतर्फे सीपीआरसह सर्व खासगी व शासकीय रुग्णालयात चाचपणी केली. मात्र, बेड शिल्लक नसल्याची माहिती दिली. आमदार पाटील यांनी दूरध्वनी केल्यानंतर सीपीआर येथे बेड उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी रुग्ण, त्यांची पत्नी व एक नातेवाईक असे तिघे रात्री साडेअकरा वाजता सीपीआरमध्ये गेले. ऑक्‍सिजन बेड कक्षात 21 बेड रिकामे असल्याचे दिसून आले. बेड शिल्लक असताना चुकीची माहिती दिली जात असेल, तर याची चौकशी झालीच पाहिजे.'' 

 सीपीआरमधील बेडची स्थिती 

  • सीपीआरमध्ये एकूण 500 बेड 
  • यातील 300 बेड कोरोना उपचारासाठी वापर 
  • सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी दीडशेहून अधिक बेड 
  • 70 बेड तीव्र लक्षणाचे रुग्ण उपचारासाठी 
  • 80 बेडवर गंभीर रुग्णांवर उपचार सुरू 
  • उर्वरित 200 बेड प्रसूती विभाग व बालक आणि अती गंभीर व्यक्तीसाठी 
  •  

सीसीटीव्ही लावण्यात चालढकल? 
सीपीआरमध्ये अधिष्ठातांच्या कक्षाजवळ सीसीटीव्ही कॅमेरा आहे, मात्र अन्य विभाग व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. कॅमेरे लावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली होती, मात्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात चाल-ढकल झाली. त्यामुळे किती रुग्ण सीपीआरमध्ये येतात, बेड नाहीत म्हणून किती परत जातात, किती वॉर्डमध्ये प्रत्यक्ष बेड आहेत, की नाहीत हे समजणे अवघड आहे. त्यामुळे कॅमेरे बसविण्यास विलंब जाणीवपूर्वक झाला का, असाही प्रश्‍न आहे. 

संपादन : विजय वेदपाठक

loading image
go to top