esakal | बेळगाव निवडणुकीत 40 पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात
sakal

बोलून बातमी शोधा

Election

बेळगाव निवडणुकीत 40 पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक मुक्त वातावरणात आणि पारदर्शक झाली नाही, असा आरोप करीत महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी मंगळवारी (ता. ७) न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव निवडणुकीत पराभूत झालेल्या ४० उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तसेच सोमवारी रात्री जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांची भेट घेऊन दोनशेहून अधिक जणांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

बेळगाव महानगरपालिका निवडणूक अतिशय घाईगडबडीने जाहीर करण्यात आली. तसेच निवडणूक जाहीर होताच राष्ट्रीय पक्षांनी तयारी केली, मात्र कोरोनाचे संकट असल्याचे सांगत निवडणूक पुढे ढकलणाऱ्या निवडणूक आयोगानेच जाणीवपूर्वक निवडणूक जाहीर केली.

याबाबत अनेकांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी नोंदवल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कोणतीही निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घ्यायचे असल्यास तर त्याला व्हीव्हीपॅट जोडणे गरजेचे आहे. मात्र जाणीवपूर्वक ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्यात आले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. अनेक मतदारसंघात वाढीव मतदान झाले नाही तरीही काही ठिकाणी मतमोजणीनंतर वाढीव मतदान झाल्याचे उघड झाले आहे. काही ठिकाणी अधिक मतदान होऊनही कमी मतदान झाले असल्याचे मतमोजणीवेळी दिसून आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवत घेण्यात आलेल्या निवडणुकीबाबत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी प्रश्न उपस्थित करीत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: वैभववाडीत भाजपचे वर्चस्व; शिवसेनेला चार जागा

चार दिवसांपूर्वीच काही उमेदवारांनी ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्याची मागणी केली होती. त्या मागणीकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या जाणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा बेळगाव महानगरपालिका निवडणुकीबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोमवारी रात्री दोनशेहून अधिक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर महेश नाईक, युवा समितीचे शुभम शेळके, माजी नगरसेवक पंढरी परब, संजय किल्लेकर, राकेश पलंगे, संतोष कृष्णाचे यांच्यासह विविध प्रभागांतील पराभूत उमेदवार उपस्थित होते.

loading image
go to top