esakal | जिल्हाधिकाऱ्यांचा इशाराही आता बेळगावकरांनी गांभिर्याने घ्यावा
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum district covid 19 count is dropped but carefully information by collector

बेळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दर केवळ दोन टक्के, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जिल्हाधिकाऱ्यांचा इशाराही आता बेळगावकरांनी गांभिर्याने घ्यावा

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : जिल्ह्यात आता कोरोना संसर्गचा दर केवळ दोन टक्के असल्याचा दावा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केला आहे. पण गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत थोडी वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. सलग तीन आठवडे अपवाद वगळता बाधीतांची संख्या 50 पेक्षा कमी येत होती.

त्यातही गेल्या काही दिवसात बाधीतांची संख्या 30 पेक्षा कमी झाली होती. पण 12 व 13 नोव्हेंबर रोजी बाधीतांची संख्या पुन्हा 50 च्या पुढे गेली आहे. 12 रोजी जिल्ह्यात 54 बाधीत सापडले, त्यात सर्वाधिक म्हणजे 18 गोकाक तालुक्‍यातील व 11 बेळगाव शहर व तालुक्‍यातील होते. 13 रोजी 52 बाधीत सापडले, त्यात सर्वाधिक 18 रायबाग तालुक्‍यातील होते. गेल्या काही दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या घटली होती. 11 व 12 नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे एकही मृत्यू जिल्ह्यात झाला नव्हता, पण 13 रोजी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकजण बेळगाव व दुसरी व्यक्ती हुक्केरी तालुक्‍यातील आहे. त्यामुळे कोरोना अजून संपलेला नाही हे स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा- कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात: अनेक कंपन्या बनावट -


 शुक्रवारी (ता.13) महापालिकेत झालेल्या प्रशासकीय बैठकीत जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे सांगीतले, पण कोरोनाबाबत गाफील न राहण्याचा सल्लाही दिला. जिल्हा न्यायालयात साक्षीदारांची दररोज कोरोना तपासणी होते. त्यात 40 जणांची तपासणी झाली त्यावेळी दोघांनाच कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा न्यायाधिशांनी जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी ती माहिती प्रशासकीय बैठकीत दिली. कोरोना काळात महापालिकेने चांगले काम केल्याचे ते म्हणाले, पण यापुढे आणखी खबरदारी घेण्याची सूचना त्यानी आयुक्त जगदीश यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मते जिल्ह्यात दररोज 2 हजार जणांची कोरोना चाचणी केली जात आहे, पण त्यातील केवळ 2 टक्के जणांचे अहवाल पॉजिटीव्ह येत आहेत. पण दिवाळी सणात बाजारपेठेत गर्दी वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असे ते म्हणाले. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव काळात प्रशासनाने निर्बंध घातले होते, पण अनंत चतुर्दशीला म्हणजे गणेश विसर्जनवेळी कोरोनाच्या नियमांचे पालन झाले नाही. त्याचा परीणाम सप्टेबर महिन्यात पहावयास मिळाला.

सप्टेबरमध्ये कोरोनाबाधीतांची व मृतांची संख्या वाढली. नवरात्री व विजयादशमीला नियमांचे काटेकोर पालन झाले, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. पण बेळगावात दिवाळी सणाला बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे बाजारपेठेत तेजीचे वातावरण पहावयास मिळाले, पण त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा इशाराही आता बेळगावकरांना गांभिर्याने घ्यावा लागणार आहे. 

संपादन- अर्चना बनगे


 

loading image