esakal | 'महापौर' पदासाठी भाजपकडून मराठी भाषिकाला संधी? निवडीकडे बेळगावकरांचे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव ः महापालिका निवडणुकीत विजयी भाजपच्या उमेदवाराला खांद्यावर घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते.

भाजप, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, एमआयएम व आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांनी प्रथमच महापालिका निवडणूक लढविली.

Belgaum Election Result 2021: भाजप मराठी 'महापौर' देईल का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: बेळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. अपवाद वगळता १९८४ पासून महापालिकेवर ३७ वर्षे सत्ता कायम ठेवलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. समितीचे केवळ ४ नगरसेवक निवडून आले. ४१ प्रभागांत रिंगणात उतरलेल्या कॉंग्रेसचे दहा नगरसेवक निवडून आले. एमआयएमनेही आपले खाते उघडले असून त्यांचा एक नगरसेवक निवडून आला आहे. आठ अपक्ष नगरसेवक यावेळी सभागृहात प्रवेश करणार आहेत. निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

भाजप, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, एमआयएम व आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांनी प्रथमच महापालिका निवडणूक लढविली. पण धजद व आम आदमी पार्टीला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. येथे प्रथमच पक्षीय पातळीवर महापालिका निवडणूक लढविणाऱ्या भाजपने थेट महापालिकेची सत्ता मिळविल्यामुळे बेळगावच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी तब्बल १ लाख १७ हजार मते मिळविली होती. लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिक एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्याचा फायदा महापालिका निवडणुकीत होईल, असा दावा केला जात होता. पण प्रत्यक्षात मात्र समितीचा धुव्वा उडाला आहे.

११ ऑगस्ट रोजी अनपेक्षितपणे महापालिका निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीला स्थगिती मिळावी यासाठीही प्रयत्न झाले. विशेष म्हणजे ज्यांनी हे प्रयत्न केले त्यापैकी काहींनी निवडणूक लढविली व मोठ्या फरकाने जिंकली. न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. यावेळी तब्बल ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली होती. कोरोना संसर्गामुळे निवडणूक प्रचारावरही निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यात उमेदवारांवर मर्यादा आल्या. भाजपने या निवडणुकीत जोरदार प्रचार केला.

भाजपच्या सर्व विभागांचे राज्यस्तरीय पदाधिकारी, मंत्री, स्थानिक आमदार व खासदार, जिल्ह्यातील आमदार व खासदार या सर्वांनीच प्रचारात सहभाग घेतला. त्या तुलनेत कॉंग्रेसकडून प्रचार झाला नाही. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार व काही माजी मंत्री वगळता अन्य कोणीही प्रचारासाठी आले नाहीत. त्याचा फटका या निवडणुकीत पक्षाला बसला. लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार प्रचार केला होता. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांची बेळगावातील सभा गाजली होती. पण यावेळी समितीच्या प्रचाराला कोणीही आले नाही. प्रत्येक प्रभागातील पंच व जेष्ठांकडे प्रचाराची धुरा होती. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला, पण त्यांचा फारसा प्रभाव दिसला नाही.

हेही वाचा: रायबाग पोटनिवडणूक: सासूच्या जागेवर सूनेची बाजी

सोमवारी (ता.६) सकाळी आठ पासून बी. के. मॉडेल शाळेत मतमोजणीला सुरूवात झाली. प्रत्येक फेरीत बारा प्रभागांची मतमोजणी हाती घेण्यात आली होती. त्यामुळे बारा उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनाच मतमोजणी सुरू असलेल्या कक्षात पाठविले जात होते. मतमोजणीच्या प्रारंभापासूनच भाजप व कॉंग्रेसने आघाडी घेतली. प्रारंभी काही जागांवर भाजपपेक्षा कॉंग्रेसचे जास्त उमेदवार आघाडीवर होते. त्यानंतर भाजपच्या उमेदवारांच्या विजयाची जणू मालिकाच सुरू झाली. बेळगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३३ नगरसेवकांची आवश्‍यकता आहे. भाजपचे ३५ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. बेळगाव महापालिकेत सत्ता स्थापन करणारा भाजप हा पहिला राजकीय पक्ष ठरणार आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप-३५

कॉंग्रेस-१०

महाराष्ट्र एकीकरण समिती-४

एमआयएम-१

अपक्ष-८

महापौर निवडीकडे लक्ष

महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाकडून आता महापौर व उपमहापौरपदासाठी मराठी भाषिकांना संधी दिली जाणार का? याकडे बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे ३५ नगरसेवक निवडून आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार भाजपमधून १५ मराठी भाषिक नगरसेवक निवडून आले आहेत. ३५ पैकी दोन नगरसेवक अनुभवी असून ३३ नवे चेहरे आहेत. त्यामुळे भाजपकडून मराठी भाषिक महापौर होणार की कानडी भाषिकांना संधी देणार, याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांचा लाठीमार

मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत जमावबंदी असतानाही उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. तसेच अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून यावेळी गुलालाची उधळण करत झेंडे मिरविले. त्यामुळे पोलिसांनी जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यावर लाठीमार करत पांगविले. यामध्ये काही जण जखमी झाले असून मोटारसायकलींचे देखील नुकसान झाले. बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर ही घटना घडली. लाठीमार सुरू होताच पळापळीत अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी पाटील गल्लीपर्यंत पाठलाग करत अतिउत्साही कार्यकर्त्यांना झोडपून काढले. अनेकांनी चप्पल सोडूनच पलायन केल्याने घटनास्थळी चप्पलांचा ढीग साठला होता.

loading image
go to top