esakal | फळ प्रक्रिया उद्योगाला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

A Blow To The Fruit processing industry Kolhapur Marathi News

जिल्ह्यात काजू बरोबरच करवंद, फणस या फळांवर तर मक्‍यामधील स्विटकॉर्न, बेबीकॉन यावर प्रक्रिया केली जाते. यातील फळांपासून जॅम, सरबत, लोणचे केले जाते, तर स्विटकॉर्न आणि बेबिकॉन प्रिझर्व करून परदेशात निर्यात केले जातात. मात्र लॉकडाउनमुळे या हंगामी उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. प्रक्रिया उद्योगातील लाखोंची उलाढाल ठप्प झाली.

फळ प्रक्रिया उद्योगाला फटका

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर ः जिल्ह्यात काजू बरोबरच करवंद, फणस या फळांवर तर मक्‍यामधील स्विटकॉर्न, बेबीकॉन यावर प्रक्रिया केली जाते. यातील फळांपासून जॅम, सरबत, लोणचे केले जाते, तर स्विटकॉर्न आणि बेबिकॉन प्रिझर्व करून परदेशात निर्यात केले जातात. मात्र लॉकडाउनमुळे या हंगामी उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. प्रक्रिया उद्योगातील लाखोंची उलाढाल ठप्प झाली. 

गगनबावडा तालुक्‍यात करवंदापासून लोणचे, सरबत बनवले जाते. या उद्योगामुळे येथे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीही झाली आहे. येथील करवंदाचे सरबत कोल्हापूरसह पुणे, मुंबई, गोवा या ठिकाणी विकले जाते. कोकणातही या सरबताला चांगली मागणी आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कच्च्या करवंदापासून लोणचे बनवले जाते. तर पिकलेल्या करवंदाच्या रसापासून सरबत बनवले जाते. मात्र यंदा लॉकडाउनमुळे ना लोणच्या मसाला उपलब्ध झाला, ना सरबतासाठी लागणारे प्रिर्झवेटिव्ह, साखर, बॉटल्स उपलब्ध झाल्या. त्यामुळे अद्याप लोणचे किंवा सरबताची निर्मितीही सुरू झालेली नाही.

मे महिन्यात लॉकडाउन कायम राहिले तर ही उत्पादने बनवताही येणार नाहीत. पर्यायाने या व्यावसायिकांवर अनिश्‍चितेचे सावट आहे. मक्‍याचे बॅबीकॉन आणि स्विटकॉर्न या प्रकारांना युरोप आणि रशियाच्या बाजारपेठेत मागणी आहे. जिल्ह्यातून बेबीकॉन आणि स्विटकॉर्नची निर्यात होते. मात्र लॉकडाउनमुळे निर्यात थांबली आहे. कारण बंदरापर्यंत माल नेण्यासाठी ट्रकचालक उपलब्ध नाहीत. या शिवाय कामगार नसल्याने उत्पादनही मर्यादितच आहे. युरोपातील निर्यात पूर्णपणे बंद असल्याने या व्यावसायिकांचे दोन महिन्यात सुमारे 60 लाखांचे नुकसान झाले आहे. 

दृष्टिक्षेपात 
करवंद सरबत निर्मिती ः 4 टन (वार्षिक) 
विक्री ः कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, रत्नागिरी 
बेबीकॉन, स्विटकॉर्न निर्मिती ः 60 टन (महिना) 
निर्यात ः युरोप, रशिया, आखाती देश. 

साखर, प्रिझरवेटिव्ह उपलब्ध नाही
करवंदापासून सरबत, लोणचे बनवण्याचा हंगाम हा दोन महिन्यांचाच असतो. लॉकडाउनमुळे साखर, प्रिझरवेटिव्ह अद्याप उपलब्ध झाले नाही. पर्यायाने करवंदाचे सरबत बनवण्यास अजून सुरुवात करता आलेली नाही. मार्च महिन्यातील विक्रीही न झाल्याने भांडवलही हातात नाही. 
- बापू जाधव, करवंद सरबत उत्पादक 

50 ते 60 लाखांचे नुकसान
बेबीकॉन, स्विटकॉर्न निर्यातीसाठी बंदरापर्यंत घेऊन जाणेच अवघड झाले आहेत. यासाठी कोरोनाच्या भीतीने ट्रकचालक माल घेत नाहीत. कामगार उपलब्ध नसल्याने प्रक्रियेचे काम थांबले आहे. आम्ही महिन्याला 150 टन बेबीकॉन, स्विटकॉर्न युरोपात पाठवतो. गेल्या दोन महिन्यांपासून हे थांबले असल्याने सुमारे 50 ते 60 लाखांचे नुकसान झाले. 
- चिन्मय काळे, फळ प्रक्रिया व्यावसायिक 

loading image