esakal | व्यापाऱ्यांची धावपळ: अकरानंतर बंद म्हणजे बंदच

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्यांची धावपळ: अकरानंतर बंद म्हणजे बंदच
व्यापाऱ्यांची धावपळ: अकरानंतर बंद म्हणजे बंदच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सकाळी अकरा वाजता जीवनावश्‍यक दुकाने बंद म्हणजे बंदच, अशी स्थिती आज बदलेल्या कडक निर्बंधाच्या दुसऱ्या दिवशी शहरात दिसून आली. केवळ औषध दुकानांना सूट मिळाली आहे. शहरातील फळविक्रेत्यांसह फेरीवालेही अकरानंतर रस्त्यावर दिसत नव्हते. त्यामुळे प्रमुख बाजारपेठांतसुद्धा सन्नाटा होता. मात्र रेल्वेफाटक परिसरातील मार्केट फुल्ल होते. तेथे सोशल डिस्टन्स पाळला जात नव्हता.

सकाळी सात ते अकरादरम्यान दुकाने उघडण्यापासून ते बंद करण्यापर्यंत व्यापाऱ्यांची धावपळ उडत आहे. अनेक ग्राहक सकाळी नऊ-साडेनऊनंतरच बाजारात येतत. काही प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत आहे. किराणामाल दुकानाच्या दारांत सोशल डिस्टन्स्‌च्या रांगा दिसत आहेत. सकाळी नार्वेकर मार्केटमध्ये भाजी खरेदीसह फळांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. विक्रेत्यांनीही कमी जादा दर करून असलेला माल विक्रीला प्राधान्य दिले.

हेही वाचा- कोल्हापुरात बिअरबार, हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची धडक कारवाई

एकाच वेळी अनेक ग्राहकांशी संवाद साधताना विक्रेत्यांची कसरत होत होती. सकाळच्या टप्प्यातच बेकरी उत्पादने खरेदीसाठी गर्दी असली तरीही काही विक्रेत्यांनी अर्धशटर उघडे ठेवूनच व्यवसाय करताना दिसत होते. शिवभोजनासाठी ही गरजूंनी तासाभरापूर्वीच रांग लावली होती. तेथे सोशल डिस्टन्स्‌ पाळला जात होता. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एक-दोनच खाद्यपदार्थाच्या गाड्या सुरू होत्या. स्थानकात हाताच्या बोटावर मोजणारेच प्रवासी होते. बेकरी वगळता अन्य काहीच सुरू असल्याचे दिसले नाही. एकीकडे नियमांचे पालन होत होते तर दुसरीकडे रेल्वेफाटक परिसरातील मार्केटमध्ये गर्दी होती. या ठिकाणी विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्स्‌ ठेवला नसल्याचे दिसून आले.

पोलिसांकडून बंदचे आवाहन

लक्ष्मीपुरी बाजारपेठेसह धान्यलाईन, सुभाष रोड परिसरात अकरा-सव्वाअकरा वाजता शांतता पसरली होती. रस्त्याकडेला आंबे विक्रेत्यांनाही परवानगी न दिल्यामुळे या रस्त्यावर केवळ पोलिसच दिसत होते. बिंदू चौक परिसरात मात्र अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक कामासाठी आल्याचे सांगून फिरणाऱ्यांची संख्या अधिक होती. पोलिस आणि महापालिकेच्या गाडीतून बंद करण्याचे आवाहन केले जात होते.

Edited By- Archana Banage