इचलकरंजीत घरफोडी; सव्वालाखांची रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी

इचलकरंजीत घरफोडी; सव्वालाखांची रोकड लंपास

इचलकरंजी - इचलकरंजी-सांगली रोडवरील पाटील मळ्यात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वालाखांची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. पोलिसांनी शेजारील औषध दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये चोरटा कैद झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील पाटील मळ्यात राहुल नेमिनाथ मगदुम (वय ४५) यांचे घर आहे. त्या ठिकाणीच एक औषध दुकान आहे. कार्यक्रमासाठी मगदूम कुटुंब रांगोळी (ता. हातकणंगले) येथील मूळ गावी गेले होते. त्यामुळे मंगळवारी (ता. १७) रात्री त्यांचे घर कुलूप बंद होते. याचा गैरफायदा उठवत चोरट्याने घर फोडले. आज सकाळी ते घरी परतले असता घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटातील सव्वालाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत मगदूम यांनी गावभाग पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून श्‍वान पथक; तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते.

चोऱ्या अनेक; चोरटा एक

सांगली रोडवर गेल्या दोन महिन्यांत तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. या चोरी करण्याच्या पद्धतीमध्ये साम्य असल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी याच भागात चोरट्यांनी एका रात्री अनेक दुकाने, घरांत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे चोरी प्रकरणात एकच चोरटा असावा, असा संशय पोलिसांना आहे.