
कोल्हापूर | लता मंगेशकरांच्या ‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण
कोल्हापूर - भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर जयप्रभा स्टुडिओच्या (Jayprabha Studio) ठिकाणी त्यांचे स्मारक (Monument) व्हावे, या मागणीने जोर धरला आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वीच लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओ विकल्याचे स्पष्ट झाले आहे. हा स्टुडिओ शूटिंगसाठीच राहिला पाहिजे. जोपर्यंत स्टुडिओ उघडून तेथे शूटिंगला सुरवात होत नाही, तोवर चित्रपट महामंडळाबरोबरच कलाकार व तंत्रज्ञांतर्फे स्टुडिओच्या दारात साखळी उपोषण होणार आहे. उद्या (रविवारी) सकाळी दहाला उपोषणाला प्रारंभ होणार आहे. याबाबतचा निर्णय चित्रपट महामंडळात आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिली.
स्टुडिओ शूटिंगसाठी तत्काळ खुला झाला पाहिजे, जयप्रभा स्टुडिओमधील इमारतीसह खुली जागा आरक्षित राहावी व शूटिंगव्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये, कोल्हापूर महापालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायीकीकरण- वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये, जयप्रभा स्टुडिओचे जतन होण्यासाठी शासनाने लक्ष घालावे आदी मागण्यांबाबत आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी झाला. बैठकीला सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, स्वीकृत संचालक रवी गावडे, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, अभिनेते स्वप्नील राजशेखर, माजी नगरसेविका सुरेखा शहा, छाया सांगावकर, रोहन स्वामी, अमर मोरे, अर्जुन नलवडे, बाबा पार्टे, विजय शिंदे, अवधूत जोशी, संग्राम भालकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा: जोतिबा खेट्याला 20 पासून सुरुवात; जाणून घ्या, कोल्हापूर अन् खेट्यांची परंपरा
शासनाकडे वारंवार मागणी
राज्य शासनाने जयप्रभा स्टुडिओ विकत घेऊन तो चित्रनगरीचाच एक भाग म्हणून चालवावा, ही मागणी चित्रपट महामंडळाने सातत्याने लावून धरली. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढून पाठपुरावा केला आहे. आजही हा पर्याय उपलब्ध असून संबंधित खासगी कंपनीकडून ही जागा शासनाने घ्यावी आणि चित्रनगरीचा एक भाग म्हणून तेथे शूटिंग व चित्रपटविषयक उपक्रम सुरू करावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
महामंडळाबरोबर कोणतीही चर्चा नाही!
महालक्ष्मी स्टुडिओतर्फे आजच सचिन राऊत यांच्या वतीने महापालिका प्रशासकांना एक पत्र देण्यात आले आहे. त्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार हे पत्र देत असून स्टुडिओच्या जागेच्या बदल्यात शहरात अन्यत्र जागा मिळाल्यास स्टुडिओची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास तयार असल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र, याबाबत महामंडळाला विश्वासात घेतले नसल्याबद्दलही बैठकीत संतप्त भावना व्यक्त झाल्या.
जनहित याचिका दाखल करणार
जयप्रभा स्टुडिओच्या जागेवरील आरक्षण कायम राहण्यासाठी महापालिकेत ठराव झाले; पण शासन पातळीवर पुढे फारसे प्रयत्न झाले नाहीत. स्टुडिओची विक्री बेकायदेशीर असून त्याविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी सांगितले. जयप्रभा स्टुडिओला मोठी परंपरा आहे. त्यामुळे स्टुडिओच्या अस्तित्वासाठी सनदशीर मार्गाने जे करणे शक्य आहे, ते करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पत्रक महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
Web Title: Chain Fasting For Jayaprabha Studio From Today Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..