esakal | रस्त्यावरील खड्ड्यांचीच केली आरती; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखी शक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावरील खड्ड्यांचीच केली आरती

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर, जनआंदोलन करुन अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणू

रस्त्यावरील खड्ड्यांचीच केली आरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोवाड : कोवाड ते कामेवाडी (ता. चंदगड) रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. खड्डे पार करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे रस्ता वाहतूकीला धोक्याचा ठरत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी रस्त्यावरील खड्ड्यांची आरती करण्यात आली. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना रांगोळी काढली. फुलांनी खड्डे सजवून आरतीतून शासनाचे लक्ष वेधले. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर, जनआंदोलन करुन अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणू असा इशारा प्रा. पाटील यांनी दिला.

कोवाड ते कामेवाडी हा १० किलोमिटर अंतराचा रस्ता उखडला आहे. गेल्या दोन वर्षापासून शासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. तालुक्यातील बहुसंख्य प्रवाशांना कोल्हापुरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावरील नेहमी वाहनांची वर्दळ असते. दोन वर्षापासून या रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास प्रवाशांना भोगावा लागत आहे. त्यामुळे शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पाटील यांनी रस्त्याच्या बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेत पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील खड्ड्यांची आरती करुन शासकीय अधिकाऱ्याना अल्टीमेट दिला. दुसऱ्या टप्प्यात अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणू, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा: लेकरांचा मृतदेह पाहून आई-बापानं फोडला हंबरडा

तालुक्यातील हेमरस व दौलत साखर कारखाने सुरू होत आहेत. हेमरस साखर कारखान्याची ८० टक्के ऊस वाहतूक कामेवाडी मार्गे सुरु असते. पण रस्त्याची अशी अवस्था झाल्याने वाहनधारकांत धडकी भरली आहे. त्यामुळे कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा शेतकरी, ऊस वाहतूकदार व प्रवाशाना रस्त्यावर घेऊन आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी गजानन राजगोळकर, विलास पाटील, लक्ष्मण बागिलगेकर, प्रा. मोहन घोळसे, संतोष सुतार उपस्थित होते.

मातीचे पॅचवर्क नको

वर्षातून एकदा या रस्त्यावरील खड्डे कारखाना सुरु होण्याच्या तोंडावर मातीने भरले जातात. मातीने भरलेले खड्डे आठ दिवसात जैसे थे स्थितीत येतात. त्यामुळे खड्डे खड्डी, डांबराने भरावेत, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे.

हेही वाचा: करवीर निवासनी 'श्री अंबाबाई' त्र्यंबोली देवीच्या भेटीला

आमदारांनी बंधाऱ्याची पाहणी करावी...

कामेवाडी बंधारा हा वाहतूकीच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याने आमदार राजेश पाटील यांनी या बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करावी. याबाबत त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी. अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

loading image
go to top