esakal | कोल्हापूर - वारणा कापशीमधून बालकाचे अपहरण
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर - वारणा कापशीमधून बालकाचे अपहरण

कुटुंबीयांनी त्याची प्रथम चौकशी आणि मग शोधाशोध सुरू केली; पण तो कोठेच आढळला नाही.

कोल्हापूर - वारणा कापशीमधून बालकाचे अपहरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शाहूवाडी : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील बालक अरव राकेश केसरे (वय ५ वर्षे ७ महिने) याचे अज्ञातांनी रविवारी अपहरण केल्याची तक्रार वडील राकेश केसरे यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व शाहूवाडी विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र साळुंके, पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहा पथके बालकाचा शोध घेत आहेत, मात्र पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अरव काल सायंकाळी पाचच्या सुमारास गल्लीतीलच लक्ष्मण कदम यांच्या घरासमोर खेळत होता. तो उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याची प्रथम चौकशी आणि मग शोधाशोध सुरू केली; पण तो कोठेच आढळला नाही. त्यामुळे अज्ञातांनी त्याला पळवून नेल्याची तक्रार वडील राकेश कदम यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार शाहूवाडी पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेणे, आसपासच्या विहिरी आणि परिसरात शोधमोहीम राबविणे सुरू केले आहे.

हेही वाचा: महापौर निवडणुकीसाठी नगरसेवक वेटिंगवर

पोलिसांनी आज कसून तपास मोहीम राबवली. वारणा कापशी येथील नाले, विहिरी, कालव्यांमध्ये यांची गळ टाकून तपासणी केली. मलकापूर एसटी आगार, बांबवडे, कापशी, भेडसगाव, कोकरूड येथील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली; मात्र संशयित असे अद्याप काही तपास यंत्रणेच्या हाती लागलेले नाहीत. तपास यंत्रणेसाठी सुमारे ३५ पोलिसांची सहा पथके तयार केली आहेत. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडी विभागाचे पोलिस अधिकारी रवींद्र साळुंखे, एलसीबीचे प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके कार्यरत आहेत.

"आम्ही अरवचा सर्व त्या पातळीवर शोध घेत आहोत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पस्तीस पोलिसांची सहा पथके शोधमोहिमेत कार्यरत आहेत. अल्पावधीतच सत्य बाहेर काढू."

- विजय पाटील, पोलिस निरीक्षक, शाहूवाडी

हेही वाचा: खळबळजनक! म्हाप्रळ खाडीत दिसले सशस्त्र अतिरेकी?

loading image
go to top