
गडहिंग्लज : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. त्याच्याशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात आहे. त्यासाठी तंदुरुस्ती (फिटनेस) महत्त्वाची असल्याने त्याबाबत सर्वांच्यात जागरूकता वाढली आहे. लॉकडाउनमुळे मिळणाऱ्या सवडीचा सदुपयोग केला जात आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी चालायला जाण्यासह सायकलिंग करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.
कोरोनावर अद्याप औषध नसल्याने जगाचीच कोंडी झाली आहे. परिणामी, कोरोना होऊच नये म्हणून खबरदारीच्या उपायांवर अधिक भर दिला जात आहे. फिजिकल डिस्टन्स राखणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे अशा उपायांचा यात समावेश आहे. त्यातही कोरोना झालाच तर चांगला फिटनेस असणारे रुग्ण त्यावर लवकर मात करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी फिटनेसची जागरूकता वाढली आहे.
लॉकडाउनमुळे बाजारपेठेसह विविध खासगी व शासकीय कार्यालयात उपस्थिती कमी ठेवण्याच्या सूचना आहेत. बाजारपेठेला वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. साहजिकच, यामुळे सर्वांना अधिक सवड मिळाली आहे. खासकरून नेहमी व्यस्त असणाऱ्यांना या रिकाम्या वेळेचे काय करायचे, असाही नवा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे प्राधान्यक्रमही बदलले आहेत. आरोग्याचे महत्त्व या निमित्ताने ठळक झाले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून मिळणारा वेळ फिटनेसला देऊन सत्कारणी लावण्याकडे कल वाढला आहे.
सकाळच्या सत्रात वडरगे, कडगाव, भडगाव, गिजवणे, दुडंगे या सर्वच मार्गांवर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सुरक्षितता म्हणून एम. आर. हायस्कूल, शिवराज महाविद्यालय या मैदानावरही चालायला येणाऱ्याची संख्या अधिक असते. सायंकाळी व्यायामासाठी फिरणाऱ्यांत महिलांचे प्रमाण जास्त असते. आठवड्यातून गुड्डाई डोंगर, काळभैरी डोंगर, इंचनाळ गणेश मंदिर, किल्ले सामानगड येथेही नागरिक चालत जातात.
गेल्या चार वर्षांत व्यायामासाठी सायकल वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून, यात युवक-युवतींचा सहभाग आहे. सायकलिंग ग्रुप सुरू करण्यात आले. या ग्रुपतर्फे सायकलीने सहलींचे आयोजन केले जात आहे. लॉकडाउनमुळे काही युवकही आता रोज सायंकाळी एका ठिकाणाला भेट देऊन "वॉकिंग'साठी वेळ देत आहेत.
कार्यक्षमता वाढते
चालण्यामुळे चांगला व्यायाम होतो. भूकही अधिक लागते. उत्साह वाढल्याने कार्यक्षमताही वाढते. त्यामुळेच रोज फिरायला गेल्याशिवाय चैन पडत नाही.
- वसंत सावंत, गडहिंग्लज
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.