esakal | पाच नद्यांचा संगम प्रयाग!‘संगमातून’ सुरू झालेला पंचगंगेचा प्रवास

बोलून बातमी शोधा

null

पाच नद्यांचा संगम प्रयाग! ‘संगमातून’ सुरू झालेला पंचगंगेचा प्रवास

sakal_logo
By
उदय गायकवाड

कोल्हापूर : उत्तरेस अलाहाबाद येथील गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचे प्रयाग हे ठिकाण जसे पवित्र मानले जाते, तितकेच पंचगंगा नदीच्या पाचही नद्या एकत्र आल्यानंतर प्रयाग हे ठिकाण पवित्र मानले जाते. ‘नंद प्रयाग’ किंवा ‘दक्षिण प्रयाग’ म्हणून ते ओळखले जाते.

कोल्हापूरच्या हद्दीलगत असलेल्या चिखली या गावानजीक कासारी आणि भोगावतीसह आलेल्या तुळशी, धामणी, कुंभी अशा पाच नद्या एकत्र येऊन पंचगंगेचा प्रवास इथे सुरू होतो. ‘संगमातून’ सुरू झालेला पंचगंगेचा प्रवास पुन्हा कृष्णा नदीच्या ‘संगमात’ संपतो. करवीर माहात्म्यमध्ये या परिसरात वालखील्यगणाश्रम असल्याचे नोंद आहे. प्रयागच्या वायव्येस अर्ध्या कोसावर शुकाश्रम आहे. आपल्या तपसाधनेने ज्ञानी झालेल्या व धर्म शास्त्र रचणाऱ्या स्वयंभू मुनींचा मन्वाश्रम आहे, तर कपिलतीर्थ हे प्रयागच्या दक्षिणेस व शुक्‍ल तीर्थाच्या उत्तरेस नदीच्या मध्यभागी आहे. असे महत्त्वाचे उल्लेख आढळतात. याचा अर्थ या ठिकाणाला वैदिक धर्माने व ऋषी मुनींच्या वास्तव्याने महत्त्व प्राप्त झाले होते. भैरवतीर्थ असाही याचा उल्लेख येतो. आज या परिसरात काहीही अवशेष आढळत नसले तरी प्रयाग संगमाच्या काठावर दत्त मंदिर आणि इतर काही लहान अवशेष दिसतात.

हेही वाचा- संकेश्वरातील लग्नात पोलिसांचे 'सावधान'! वधु-वरासह 13 जणांवर गुन्हा

विशाळगडाच्या दिशेने येणारी कासारी नदी ६९ किमी. अंतर पार करून इथे येते. दक्षिणेकडून येणारी भोगावती नदी ८३ किमी., तुळशी ३० किमी., कुंभी ४८ किमी., धामणी ४१ किमी. अंतर पार करून या संगमाच्या ठिकाणी येते आणि पूर्वेकडे या दोहोंचा प्रवाह पंचगंगा नदी म्हणून ६७ किमी. वाहत राहतो. हे दृश्‍य अतिशय मोहक आहे. चारी बाजूला हिरवीगार शेती आणि कायम तुडुंब भरलेल्या नद्यांची पात्रे समृद्धीचा उत्तम आविष्कार ठरतात. क्षितिजावर दूरवर रेंगाळणाऱ्या सह्याद्रीच्या उतरत आलेल्या डोंगरांच्या रांगा आणि त्यांच्या कुशीतून वाहत येणाऱ्या नद्यांचे प्रवाह हे प्रत्येक ऋतूमध्ये आपले भिन्न रूप सादर करताना दिसतात.

पुराच्या काळात कोणता प्रवाह कोठून येतो हे कळत नाही. चोहीकडे पाणीच पाणी, त्याचा गढूळलेला रंग आणि पाण्यात फिरणारे भोवरे हे नदीचा रुद्रावतार डोळ्यांसमोर आणतात, तर हिवाळ्यात धुक्‍याची झालर पांघरून मध्येच दर्शन देणारी नदी आणि उन्हाळ्यात चंदेरी चमचम ल्यालेले पाणी पहाटे आणि तिन्ही सांजेला काठावरच्या शेतीचा गडद हिरवा रंग घेऊन आपली नजाकत पेश करत असते. पवित्र ठिकाण म्हणून स्नान आणि देव दर्शन याचबरोबर अंत्यसंस्कारानंतरचे काही विधी करायला इथे लोक आलेले दिसतात.

नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा विचारात घेतला तर आता स्नान टाळून प्रतीकात्मक कृती केली पाहिजे. नैवेद्य, निर्माल्य, फूल, केस, रक्षा अशा बाबींचे विसर्जन पूर्णतः टाळले पाहिजे. कपडे धुणे, वाहने, जनावरे धुणे या कृतीही थांबल्या पाहिजेत, तरच हे प्रयाग म्हणून पवित्र ठेवलेल्या ठिकाणाचे पावित्र्य कायम राहील.

नद्या आणि मंदिर

अंबाबाई मंदिरात रामाच्या देवळामागे भद्रा, शिवा, कुंभी, भोगावती, सरस्वती या पाच गंगांच्या मूर्ती असलेले मंदिर आहे.

Edited By- Archana Banage