esakal | गडहिंग्लजच्या मिरचीला झोंबला "कोरोना'!
sakal

बोलून बातमी शोधा

"Corona" Affected Gadhinglaj's Chilli Market Kolhapur Marathi News

दरवाढीचे एकेक टप्पे पादाक्रांत करून उच्चांक प्रस्थापित केलेल्या जवारी (संकेश्‍वरी) मिरचीसह इतर जातीच्या मिरचीलाही "कोरोना' झोंबल्याचे चित्र तयार झाले आहे. शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली सुमारे चारशेहून अधिक जवारी, ब्याडगीसह अनेक जातीची मिरची शिल्लक आहे. कर्नाटकातून येणारी ब्याडगी मिरचीची आवक मुळात अतिवृष्टीमुळे उशिराने सुरू झाली.

गडहिंग्लजच्या मिरचीला झोंबला "कोरोना'!

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : दरवाढीचे एकेक टप्पे पादाक्रांत करून उच्चांक प्रस्थापित केलेल्या जवारी (संकेश्‍वरी) मिरचीसह इतर जातीच्या मिरचीलाही "कोरोना' झोंबल्याचे चित्र तयार झाले आहे. शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली सुमारे चारशेहून अधिक जवारी, ब्याडगीसह अनेक जातीची मिरची शिल्लक आहे. कर्नाटकातून येणारी ब्याडगी मिरचीची आवक मुळात अतिवृष्टीमुळे उशिराने सुरू झाली. जवारी व ब्याडगी मिरचीला नुकताच ग्राहकांचा सुरू झालेला ओढा "कोरोना'मुळे बंद झाल्याने यंदा मिरची उत्पादक, व्यापारी आणि ग्राहकांच्या संकटात आणखीन भर पडली आहे. 

मिरचीची प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. येथील उच्चांकी दरामुळे दरवर्षी जवारी मिरची ग्राहकांना झोंबते. यंदाही ती झोंबली आणि आता जवारी मिरचीलाच कोरोना झोंबला आहे. आगामी वर्षभरातील मिरची पावडरची बेगमी करून ठेवण्यात येते. म्हणून मार्चपासून गृहिणींकडून मिरचीला मोठी मागणी असते. त्यासाठी या महिन्यात किरकोळ मिरची विक्रीचा स्वतंत्र बाजारही भरत असतो.

याशिवाय अडत व्यापाऱ्यांकडेही मिरचीला मागणी असते. येथील मिरची कोकण, पुणे, कोल्हापूर, मुंबईलाही जाते. या महिन्यात सर्वत्र मिरचीची विक्री होत असते. आता कुठे तरी मिरचीची विक्री होत होती. या महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात गर्दी पहायला मिळाली. परंतु, 15 मार्चपासून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद केले आहेत. यामुळे मिरचीचा उठाव ठप्प झाला आहे. परिणामी 31 मार्चपर्यंत पाच सौदे बंद होणार असून खरेदी आणि विक्रीच्या माध्यमातून होणारी सुमारे 50 लाखाची उलाढाल थांबली आहे. 

स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून येणारी मिरची थांबली आहे. स्थानिक मिरचीची 95 टक्के आवक बंद झाली आहे. कर्नाटकातून ब्याडगी मिरचीही यंदा मार्चपासूनच येत आहे. अतिवृष्टीमुळे तेथील मिरचीलाही मोठा फटका बसला आहे. या भागात ब्याडगी मिरचीला मागणी असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यंदा ती उशिरा सुरू झाली. ब्याडगीच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांना आता बंदमुळे मिरचीच मिळेनासी झाली आहे. अडत व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेत्यांचाही बाजार बंद असल्याने मिरचीची उलाढाल ठप्प झाली आहे.

उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी यापूर्वी घेतलेली चारशेहून अधिक पोती मिरची शिल्लक आहे. सौदे बंद असल्याने कर्नाटकातील मिरचीची आवकही ठप्प आहे. आता तर जमावबंदी आदेशामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद झाली आहे. यामुळे हुबळी, धारवाडहून येणारी ब्याडगी तेथेच अडकून पडली आहे. परिणामी गृहीणींना मिरची पावडरची काळजी लागून राहिली आहे. कधी एकदा कोरोना जातो आणि मिरची मिळते अशा प्रतिक्रिया गृहीणींतून येत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरच गृहीणींची मिरचीपूडसाठी धावपळ उडणार आहे. 

अत्यावश्‍यक पण...आवक नाही 
शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री व्हावी आणि ग्राहकांनाही आवश्‍यक त्या मालाचा पुरवठा व्हावा म्हणून पणन महामंडळाने बाजार समित्या नियमित सुरू ठेवण्याचे परिपत्रक काढले आहे. परंतु, आंतरराज्य प्रवेश बंदी असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाल्याने मिरचीची आवकच बंद झाली आहे. शिवाय मिरची सौदे आणि आठवडा बाजार बंद झाल्याने बाजार समिती उत्पन्नाला सुमारे लाखभराचा फटका बसल्याचे बाजार समितीचे बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. 

मिरची विक्रीचा प्रश्‍न 
बाजारपेठाच बंद असल्याने शिल्लक मिरची विक्रीचा प्रश्‍न तयार झाला आहे. चारशेहून अधिक पोती मिरची शिल्लक असून कोरोनाच्या परिस्थितीवर जनजीवन पूर्वपदावर येणार की नाही, हे कळणार आहे. यासाठी अजून काही दिवस थांबावे लागणार आहे. बाजारपेठा सुरू झाल्या तरी शिल्लक मिरचीची विल्हेवाट लावल्यानंतरच व्यापारी नवीन मिरचीची खरेदी करण्याची चिन्हे दिसत आहेत. मार्च महिन्यातच मिरचीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतो. कर्नाटकातील मिरचीही येत होती. मिरची बाजार तेजीत राहणार अशी चिन्हे दिसत असतानाच कोरोनाच्या प्रवेशामुळे हा बाजार कोलमडला आहे. 

फटका उत्पादकांसह व्यापाऱ्यांनाही...
कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आठवडा बाजार, सौदे बंद झाले आहेत. यामुळे गडहिंग्लजला मिरचीचा बाजार कोलमडला आहे. त्याचा फटका उत्पादकांसह व्यापाऱ्यांनाही बसणार आहे. 
- राजन जाधव व भरतकुमार शहा, मिरची व्यापारी, गडहिंग्लज

loading image