गांधीनगरमधील वसाहत रुग्णालयाचा कोरोना काळात असाही आदर्श

GADHINAGAR HOS.png
GADHINAGAR HOS.png

गांधीनगर ः कोरोना महामारीच्या काळात गांधीनगर (ता. करवीर) परिसरातील सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करून येथील वसाहत रुग्णालयाने अविरत सेवा दिली आहे. मार्च महिन्यापासून ऑगस्टपर्यंत लॉकडाउनच्या काळातसुद्धा वीस हजारांहून अधिक बाह्यरुग्ण आणि पाचशेहून अधिक आंतररुग्णांवर उपचार करून सक्षम वैद्यकीय सेवा पुरविली आहे. 
स्वातंत्र्यापूर्वी दुसऱ्या महायुद्धामध्ये शरणागत आलेल्या पोलंडवासीयांना सेवा देण्यासाठी वळिवडे कॅंपमध्ये वसाहत रुग्णालय सुरू करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर फाळणीनंतर सिंध प्रांतातून आलेल्या बांधवांसाठी हे रुग्णालय सुरू ठेवण्यात आले. 1983 पर्यंत सध्याच्या पोलिस ठाण्याच्या ठिकाणी हे रुग्णालय कार्यरत होते. 1983 साली सध्याची इमारत बांधण्यात आली आणि या ठिकाणी रुग्णसेवा सुरू राहिली. सध्या या ठिकाणी 50 बेडची व्यवस्था आहे. काळानुरूप यामध्ये बदल होत गेले; परंतु रुग्णसेवेचा वसा आणि वारसा अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. 
यावर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले. त्यावेळी परिसरातील गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड आणि कोयना कॉलनीमधील रुग्णांना या रुग्णालयाचा आधार होता. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. परंतु या कठीण काळामध्ये इतर रुग्णांसाठी वसाहत रुग्णालयातून अविरतपणे सेवा देण्यात आली. मार्च ते ऑगस्ट अखेर सहा महिन्यांच्या कालावधीत वसाहत रुग्णालयात 20530 बाह्यरुग्णांवर उपचार केले. तर 575 आंतररुग्णाना उपचाराचा लाभ झाला. 
सर्वसामान्यांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वच रुग्णांसाठी वसाहत रुग्णालय हे उपचाराचे हक्काचे ठिकाण बनले. येथील डॉ. विद्या पॉल, डॉ. बीना रुईकर, डॉ. एस. एस. वाघ, डॉ. एस. बी. माळवी, डॉ. एस. ए. कुराडे या वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर येथील नर्सिंग, इतर आणि सफाई कर्मचाऱ्यांनी अविरत तत्पर सेवा देऊन रुग्णांना दिलासा दिला आहे. 


कोल्हापुरातील पीआर रुग्णालय कोविड सेंटर झाल्यानंतर थॅलेसेमिया रुग्णांसाठी या ठिकाणी वेगळा वॉर्ड तयार केला आहे. या रुग्णांना रक्ताची जास्त गरज असते. या रुगणांमध्ये 1 ते 2 वर्षे वयाची लहान मुलेसुद्धा असतात. या प्रकारच्या रुग्णांसाठी या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत. सर्व थॅलेसेमिया रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. 
- डॉ. विद्या संजय पॉल, वैद्यकीय अधीक्षक 

- संपादन ः यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com