esakal | महापालिका रुग्णालयांत औषध तुटवडा; साधनांची कमतरता

बोलून बातमी शोधा

null
महापालिका रुग्णालयांत औषध तुटवडा; साधनांची कमतरता
sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेची रुग्णालये आणि कोविड सेंटर फुल्ल होऊ लागली आहेत. परिणामी, येथे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी यासह खोकल्याच्या औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. पालिकेची अखंड यंत्रणाच आता कोरोना प्रतिबंधात्मक कामाला लागली असली तरी साधनांची कमतरता भासत आहे. पालिकेने त्यासाठीच आता ६१ कोटींचा प्रस्ताव दिला आहे; पण तातडीने औषधे मिळावीत, अशी वैद्यकीय अधिकाऱ्यांतून मागणी केली जात आहे. पालिकेला सामाजिक संस्था, संघटनांनाही मदत केली तरच संकट टळणार आहे.

कोरोनाचे संकट भीषण होत असताना आता यंत्रणेवर ताण पडत आहे. गतवर्षी आयसोलेशन हॉस्पिटलम्ये येथे डॉ. द्वारकानाथ कोटणीस कोविड डेडीकेटेड हॉस्पिटलची उभारणी केली आहे. येथे आता ७० बेड आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या डीओटीमध्येही कोरोना केअर युनिट महापालिकेने सुरू केले आहे. सध्या महापालिका सुमारे ३०० हून अधिक रुग्णांवर उपचार करीत आहे; पण रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. महापालिकेला औषध देणाऱ्या एजन्सीच्या टेंडरची मुदत संपली आहे. ३० तारखेला नवे टेंडर उघडले जाईल. त्यानंतर ती सर्व प्रक्रियेला वेळ लागणार आहे.

आरटीपीसीआर आवश्‍यकच

कोणत्याही रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होताना आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल सॅम्पल दिलेला मेसेज पुरावा म्हणून आवश्‍यक आहे. अशा रुग्णांना पालिकेचे रुग्णालय, सीपीआर अथवा सरकारी कोरोना केअर युनिटमध्ये दाखल करता येणार आहे. लक्षणे दिसायला सुरू होताच आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. त्यामुळे उपचारांसाठी दाखल होताना परवड होणार नाही. अन्यथा रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट टाळून एचआरसीटी करतात. परिणामी, उपचारांसाठी दाखल होताना अडचणी निर्माण होतात.

'डीओटी'ला पाण्याची कमतरता

पालिकेने शिवाजी विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे २५० बेडचे कोरोना केअर युनिट सुरू केले आहे; पण येथे सध्या पाणी प्रश्‍न भेडसावतो. येथे पाण्याचा स्रोत असून, टाकीला गळती आहे. महापालिका अथवा विद्यापीठ प्रशासनाने पाण्याच्या टाकीची गळती काढावी अथवा तात्पुरत्या टाकीची व्यवस्था करावी. महापालिका, विद्यापीठाकडे पाण्याचे टॅंकर आहेत, ते अशा ठिकाणी उपयोगात आणायचे नाहीत तर कोठे, अशी विचारणाही आता नागरिकांतून होत आहे.