उद्या गुलाल कोणाचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

by election result

उद्या गुलाल कोणाचा?

कोल्हापूर : जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागलेल्या उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीची मतमोजणी उद्या (ता. 16) सकाळी 8 पासून राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे सुरु होत आहे. या निकालाबाबत प्रचंड उत्स्कुता आहे. उद्याच जोतिबाची चैत यात्रा आहे. या यात्रेत होणाऱ्या गुलालाची उधळण कोणाला सार्थक ठरणार हे स्पष्ट होणार आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. 

उत्तर मतदारांच्या पोटनिवडणूकीसाठी मंगळवारी (ता. 12) 2 लाख 91 हजार 798 मतदारांपैकी चुरशीने 1 लाख 78 हजार 542 मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे. इतर 12 मतदारांनीही मतदान केले. असे एकूण 61.19 टक्के मतदान झाले. या निवडणूकमुळे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातून राजभरातील राजकीय नेते निवडणूकी प्रचारात उतरले. त्यामुळे या निकालाकडे कॉंग्रेस आणि भाजपचे अस्तित्व ठरवणारी निवडणूक म्हणून पाहिले जात आहे.

या निवडणूकीच्या निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटणार आहे. याशिवाय, आगामी विद्यानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणूकांवर होणार आहे. दरम्यान सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरूवात होईल. त्यानंतर ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एक टेबलवर टपाली तर इतर 14 टेबलवर यंत्रातील मतमोजणीला होईल. यासाठी 26 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होईल. कसबा बावड्यातील 21 मतदान केंद्रापासून ही मतमोजणी सुरु होईल. याच फेरीत इतर फेरींमधील निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 पार्किंग व्यवस्था :

शासकीय गोदाम येथे महाविकास आघाडीकडून येणाऱ्या उमेदवार व उमेदवार प्रतिनिंधीसाठी एका बाजुला तर भाजपच्या प्रतिनिधींसाठी दुसऱ्या बाजुला पार्किंग व्यवस्था केली आहे. यामुळे कोणताही वाद घडू नये याची पोलीसांनी खबरदारी घेतली आहे.