आणखी किती तरणीबांड पोरं गमवायची?

आणखी किती तरणीबांड पोरं गमवायची?

कोल्हापूर : बारा दिवसांपूर्वी चुलत भाऊ(Cousin)गेला. त्याच्या पाठोपाठ दोन दिवसांनी त्याचा धाकटा मुलगा प्रशांत गेला. थोरला मुलगा श्रीकांतही पॉझिटिव्ह आणि त्याच्यावरही उपचार सुरू होते. त्यामुळे घरातला किमान हा कर्ता पुरुष जगावा, यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले; पण अखेर त्यानेही काल या जगाचा निरोप घेतला. संचारबंदी असून लोक कसेही आणि कुठेही फिरताहेत आणि त्यावर कसलेच बंधनही नाही. हा कसला लॉकडाउन? (Lockdown) आपण आणखी किती तरणीबांड पोरं गमवायची? असे अनेक प्रश्न देवस्थान समितीत वरिष्ठ अधिकारी असणारे दीपक म्हेत्तर उपस्थित करतात. (covid-19-impact-kolhapur-youth-died-news)

म्हेत्तर यांचा सारा गोतावळा मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळ परिसरातला. मुळात पहिल्या लाटेत या गोतावळ्यानं कोरोनाचा विळखा अक्षरश: जवळून बघितला होता. तब्बल १४ जण पॉझिटिव्ह आलेले; पण उपचारानंतर साऱ्यांनीच कोरोनावर यशस्वी मात केली होती. दुसरी लाट आली आणि म्हेत्तर यांचे चुलत भाऊ शिवाजी, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले श्रीकांत आणि प्रशांत पॉझिटिव्ह आले. तत्पूर्वी गेल्या २४ एप्रिललाच प्रशांत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला होता. प्रशांत या परिसरात विकी नावाने सर्वपरिचित. अपंगांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी लढणारा. त्यामुळं त्याचा मित्र परिवारही मोठा. मात्र, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सारेच कुटुंब कोलमडून पडले. एकापाठोपाठ एक अशा घरातल्या तीन्ही कर्त्या पुरुषांनी जगाचा निरोप घेतला.

म्हेत्तर सांगतात, ‘‘मुळात पहिल्या लाटेतच आम्ही कोरोनाचा विळखा अनुभवला होता. एकापाठोपाठ १४ जण पॉझिटिव्ह आले होते. उपचारानंतर आम्ही त्यावर मात केली. पण, त्यानंतर जो भेटेल त्याला खबरदारी घेण्याची विनंती करीत होतो. कारण कोरोनावर जरी मात केली तरी ते दुखणं काय असते आणि दवाखाना काय असतो, हे आम्ही जवळून बघितलं होतं. ही वेळ वैऱ्यावरही येऊ नये, अशी आमची साऱ्यांची प्रामाणिक भावना. पण, अखेर दुसऱ्या लाटेत आमच्या परिवारात कोरोना कसा शिरला हे आम्हालाही समजले नाही.

ही वेळ येऊ देऊ नका...

एका कुटुंबातले तिन्ही कर्ते पुरुष गेले. घरी आता फक्त महिला आणि मुलेच उरली आहेत. त्यामुळे त्यांना ही तीन माणसं गेल्याची माहितीही आम्ही दिली नव्हती; पण किती दिवस त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवणार? अशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. तीशी-चाळीशीतील पोरंच या लाटेत मोठ्या संख्येने आपण गमावतो आहोत. आमची तीन माणसं गेली. तेव्हा त्यांच्या शेजारचेही काही तरुण पोरांनी अखेरचा श्वास घेतला होता. खरं तर गेल्या वर्षीसारख्या कडक लॉकडाउनची आता गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा. उगाचच गर्दी करून जत्रा भरवू नका, असे आवाहनही म्हेत्तर करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com