
डॉक्टरांचाच जीव टांगणीला;आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही स्थिती
जयसिंगपूर (कोल्हापूर) : शहरातील कोरोना सेंटरमधील रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी तीन दिवसांपासून डॉक्टरांना धावपळ करावी लागत आहे. रविवारी पहाटेपर्यंत ऑक्सिजन पुरवठा झाला नसता तर अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला असता. धोक्याची घंटा ओळखून कोरोना सेंटरमधील रुग्णांना अन्यत्र हलवा, असे नातेवाईकांना सांगण्याची वेळ प्रथमच डॉक्टरांवर आली. मात्र, हा धोका टळला नसून ऑक्सिजनचा अनियमित पुरवठा रुग्णांसाठी जीवघेणा ठरु शकणार आहे. आम्ही रुग्णांच्या मृत्युची वाट पहायची का? असा सवाल डॉक्टरांकडून विचारला जात आहे.
शहरात सात हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार सुरु आहे. मात्र, तीन दिवसांपासून ऑक्सिजन मिळवण्यासाठी डॉक्टरांची कसरत सुरु आहे. रुग्णांना जीवदान देण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी रात्रीचा दिवस केला असताना प्रशासनाकडून मात्र ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत आहे. शनिवारी दिवसभर डॉक्टरांनी ऑक्सिजनसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पिंजून काढला. मात्र, सर्वत्र ऑक्सिजन टंचाई होती.
डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलावून रुग्णांची अन्यत्र व्यवस्था होत असेल तर निर्णय घेण्याचेही अधिकार देत हतबलता दाखवली. रविवारी पहाटेपर्यंत ऑक्सिजन मिळाला नसता तर मात्र अनर्थ घडला असता. प्रशासनाचा कारभार रुग्णांच्या जीवावर बेततो की काय अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. ऑक्सिजनचा नियमित पुरवठा न झाल्यास मात्र पुन्हा आणीबाणीची स्थिती निर्माण होऊन रुग्णांचा जीव धोक्यात येणार आहे.
नवे रुग्ण दाखल करुन घेणे बंद ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन कोरोना सेंटरमध्ये रुग्ण दाखल करुन घेणे डॉक्टरांना धोक्याचे वाटू लागले आहे. यातून शहरातील कोरोना सेंटरमध्ये चार दिवसापासून नवे रुग्ण दाखल करुन घेणे बहुतांश डॉक्टरांनी बंद केल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची सर्वत्र धावपळ सुरु असल्याचे चित्र शहरात आहे.
आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही स्थिती
जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. ऑक्सिजनअभावी कोरोनाबाधित रुग्णांची तडफड सुरू आहे, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे. काही रुग्णांना बेडही मिळणे मुश्किल झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर असताना जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील जनतेसाठी युद्धपातळीवर पुढाकार घेणे अपेक्षित आहे. त्यांच्या मतदार संघातील, त्यांचे मूळ गाव असलेल्या यड्रावमधील ऑक्सिजन प्रकल्प गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने त्या परिसरातील कोविड सेंटरमधील रुग्णांचा तडफडावे लागले. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेबाबत त्यांनी आता तरी पुढाकार घ्यावा.
काही दिवसापासून ऑक्सिजनच्या अनियमित पुरवठ्याने रुग्ण सेवा देणे कठीण बनले आहे. उपचारापेक्षा अधिक वेळ ऑक्सिजन मिळवण्यासाठी खर्च करावा लागत आहे. नवे रुग्ण दाखल करुन घेण्यावर मर्यादा आल्या आहेत. ऑक्सिजन मिळेल, याची खात्री नसल्याने डॉक्टरांवर संकट आले आहे.
-डॉ. सविता पाटील, आशिर्वाद, कोरोना सेंटर, जयसिंगपूर
Edited By- Archana Banage
Web Title: Covid 19 Update Jaysingpur Kolhapur Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..