esakal | आईने फोडला हंबरडा; पाण्याच्या टाकीत पडून गणेशचा दुर्दैवी मृत्यू

बोलून बातमी शोधा

null
आईने फोडला हंबरडा; पाण्याच्या टाकीत पडून गणेशचा दुर्दैवी मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्याने गुदमरून चार वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापूर नाक्‍यावरील स्वामी मळा परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजता ही घटना उघडकीस आली. गणेश सचिन वंडकर (वय ४, मूळ रा. इस्लामपूर जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः यंत्रमाग कामगार सचिन वंडकर कुटुंबीयांसमवेत स्वामी मळा भागात भाडेतत्त्वावरील घरात राहतात. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास गणेशची आई भिशी भरण्यासाठी घराबाहेर पडली. वडीलही कामावर होते. वंडकर कुटुंब राहत असलेल्या घरात भूमिगत टाकी आहे. घरामध्ये चार वर्षीय गणेश खेळत होता. मुलाची आई घरी आल्यानंतर गणेश दिसून आला नाही. त्यांनी त्याचा आजूबाजूला शोध सुरू केला. परिसरात दोन तास शोध घेऊनही गणेश आढळून आला नाही. यानंतर शेजारी बागवान यांच्याकडील सीसीटीव्हीमध्ये पाहणी केली. यावेळी गणेश घरातून बाहेर पडला नसल्याचे दिसले. सर्वांनीच घरामध्येच पुन्हा शोध सुरू केला. त्यावेळी घरमालकाचे भूमिगत पाण्याच्या टाकीच्या उघडलेल्या झाकणाकडे लक्ष गेले. पाण्याच्या टाकीत गणेश निदर्शनास आला. त्याला तातडीने उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यावेळी त्याच्या आईने हंबरडा फोडला.