
कागल : पोलीस असल्याची बतावणी करून २२ लाख रुपये हातोहात लांबवले
कागल : पोलीस असल्याची बतावणी करून तुमच्या गाडीच्या कागदपत्रांची आम्हाला पाहणी करायची आहे. असे सांगून कारमधील बावीस लाख रुपये दोघा चोरट्यांनी हातोहात लांबवल्याची घटना कागल पंचतारांकित एमआयडीसी रोडवर घडली. याबाबतची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात महेश जगन्नाथ काटकर (रा.अभयचीवाडी ता . कराड ) यांनी दिली आहे . पोलीसांच्या हद्दीच्या वादात रात्रीची घटना तब्बल बारा तासांनी गुन्हा नोंद करण्यात आला.
कागल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, महेश काटकर व त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती असे दोघेजण हुपरी येथून रोख रक्कम व चांदीचा कच्चा माल घेऊन स्वतःच्या कारमधून सेलम तमिळनाडूकडे जात होते. पंचतारांकित एमआयडीसी रोड ते लक्ष्मी टेकडी दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या मसोबा मंदिरा जवळ दोघा चोरट्यांनी स्विफ्ट कार काटकर यांच्या गाडीच्या आडवी मारून काटकर यांची गाडी थांबवली . दमदाटी करत आपण पोलिस आहोत असे सांगून गाडीच्या कागदपत्रांची पाहणी करण्याचा बहाणा करत गाडीच्या कप्यामधून २२ लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली .
काटकर व त्यांच्या सोबतच्या व्यक्तीला लक्ष्मी टेकडी येथे सोडून चोरट्यांनी चारचाकी वाहनातून पळ काढला . त्यानंतर काटकर यांनी हुपरी ,गोकुळ शिरगाव व कागल येथे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. हद्दीच्या वादामुळे काल रात्री घडलेली घटना तब्बल बारा तासानंतर आज दाखल झाली. याबाबतची फिर्याद महेश काटकर यांनी कागल पोलिसात दिली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे हे करीत आहेत .
Web Title: Crime News Kagal Pretending Policeman Fraud Of 22 Lakh Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..