पंचगंगा, रंकाळ्याचे प्रदुषण केल्यास फौजदारी, जनावरे, वाहने धुण्यासही बंदी

 Criminal in case of pollution of Panchganga, Rankala
Criminal in case of pollution of Panchganga, Rankala

कोल्हापूर : शहरातील पंचगंगा नदी घाट परीसर, रंकाळा तलाव, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ तलाव या जलसाठयांच्या ठिकाणी कचरा व निर्माल्य टाकूण प्रदूषण करणाऱ्यांवर महापालिकेतर्फे कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या जलसाठयाच्या ठिकाणी जनावरे व वाहने धुणे अशा प्रकारचे कृत्य करून पाण्याचे प्रदुषण व अस्वच्छता करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. या कारवाईसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील चार स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक, मुकादम व महापालिकेचे कर्मचारी यांचा समावेश आहे. याचबरोबर संबंधीत पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे 
पंधरा दिवसापुर्वी जयंत्ती नाल्यातून थेट पंचगंगा नदीत मैलायुक्त पाणी मिसळत असल्याबाबत प्रजासत्ताक संस्थेच्या दिलीप देसाई यांनी तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेवर कारवाईची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आता पंचगंगा प्रदूषण रोखण्याचा विषय पुन्हा गांभीर्याने घेतला आहे. नदीत, तलावात कचरा टाकणे, धुण, जनावरे धुणे याबाबींवर आता कारवाईची पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी वरिष्ट अधिकाऱ्यांवरही जबाबदारी सोपविली आहे. घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, एसटीपी ही कामे व्यवस्थीत होतात की नाही, यासाठी अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र टीम बनविल्या आहेत. 
कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदी घाट परीसर, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव व राजाराम बंधारा या ठिकाणी कचरा, निर्माल्य टाकणे, जनावरे व वाहने धुणे हे प्रकार सर्रास सुरु असतात. पण पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी अशा प्रकारांना निर्बध घालणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कारवाईची भुमिका महापालिकेला घ्यावी लागत आहे. प्रशासक डॉ.बलकवडे यांनी या विषयात लक्ष घातले आहे. शहरातील नागरीकांनी पंचगंगा नदी, रंकाळा तलाव यासह महत्वाच्या जलाशय असणाऱ्या ठिकाणी निर्माल्य अथवा कचरा टाकून तसेच जनावरे व वाहने धुवून प्रदुषण अथवा अस्वच्छता करू नये,असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. 

कोल्हापूर शहरातून पंचगंगा नदीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी महापालिका विविध स्तरावर प्रयत्न करतच आहे. पण या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ असणे अपेक्षित आहे. कांही नागरिक नदीत निर्माल्य,कचरा टाकणे,जनावरे धुणे असे प्रकार करतात. त्यांना पहिल्या टप्यात ताकीद दिली जाणार आहे. त्यानंतरही हे प्रकार थांबले नाहीत तर दंडात्मक कारवाई केली जाईल. दंडात्मक कारवाईनंतरही प्रकार थांबले नाहीत तर मात्र फौजदारीसारखी कारवाई करावी लागेल. नागरिकांनी अशी कारवाई करण्याची वेळ आणू नये. 
समीर व्याघ्राबंळे, पर्यावरण अभियंता, महापालिका 

- संपादन यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com