esakal | ब्ल्यू, रेड लाईनचा परिपूर्ण  प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

ब्ल्यू, रेड लाईनचा परिपूर्ण  प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय 

जुन्या ब्ल्यू आणि रेड लाईन बदलून नव्या ब्ल्यू, रेड आणि ग्रीन लाईनची कार्यवाही करण्यासाठी आज प्रशासनाने महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव ठेवला होता. त्याला नगरसेवकांनी विरोध करून तो नाकारला.

ब्ल्यू, रेड लाईनचा परिपूर्ण  प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : जुन्या ब्ल्यू आणि रेड लाईन बदलून नव्या ब्ल्यू, रेड आणि ग्रीन लाईनची कार्यवाही करण्यासाठी आज प्रशासनाने महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव ठेवला होता. त्याला नगरसेवकांनी विरोध करून तो नाकारला. याचवेळी प्रशासनाने हे नाकारता येणार नाही, अशी भूमिका मांडल्यावर चर्चेअंती परिपूर्ण फेरप्रस्ताव महासभेसमोर सादर करा, माहिती होऊ द्या, त्यानंतरच मंजुरीबाबत चर्चा होईल, असे सांगण्यात आले. महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या. 
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मोजकेच नगरसेवक सभागृहात होते, तर बहुतांशी ऑनलाईनवर सहभागी झाले. महापुराच्या ब्ल्यू, रेड लाईनसंदर्भात अखेर गतवर्षी जलसंपदा विभागाने शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या सर्व्हेला जलसंपदा सचिवांनी मंजुरी दिली. गतवर्षी महापुराने हाहाकार माजविला. त्यामुळे हा ब्ल्यू आणि रेड लाईनचा विषय चर्चेत आला. या ब्ल्यू आणि रेड लाईनबरोबरच ग्रीन लाईन तयार केली आहे. शासनाने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या महासभेत सहाय्यक संचालक (नगररचना) विभागाकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला. यात सहाय्यक संचालक (नगररचना) प्रसाद गायकवाड यांनी फेरबदलाचा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक सत्यजित कदम यांनी हा प्रस्ताव येथे का आणला, असा सवाल केला. यावर्षीच्या पावसातही पहिला मजला पाण्याखाली असलेले अपार्टमेंट त्यांच्या रेडझोनमध्ये आले नाही ? त्याला मान्यता कशी द्यायची? ही लाईनच चुकीची आहे. त्याच्या लेव्हल किती होत्या, याची माहिती घेतली आहे काय ? आयुक्तांनी स्वतः भेट देऊन तेथे पाहणी केली आहे. तरीही अशा लाईनला मंजुरी कशी द्यायची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 
शारंगधर देशमुख यांनी ही लाईन कोणी तयार केली, त्याला मंजुरी कोणी दिली? आमच्यासमोर का आणताय ? आम्ही यात बदल करू शकतो का? अशा प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. विजय सूर्यवंशी यांनीही याची परिपूर्ण माहिती द्या, त्यानंतर पाहूया असे स्पष्ट केले. अखेर कदम आणि देशमुख दोघेही आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. 


माहिती द्या, पुढील भूमिका ठरवू 
सहाय्यक संचालक गायकवाड यांनी सभागृहाला प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न केला. सर्व्हेची सर्व प्रक्रिया जलसंपदा विभागाने केली आहे. मंजुरीही त्यांनीच दिली आहे. त्याची अंमलबजावणी केवळ आमच्या विभागाकडून केली जाते. त्यामुळे माहितीसाठी हा प्रस्ताव महासभेसमोर ठेवल्याची माहिती दिली; मात्र ती ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणीही नव्हते. हा प्रस्ताव परिपूर्ण करून नेमक्‍या कोणत्या ठिकाणी ब्ल्यू, रेड आणि ग्रीन लाईन आहेत, याची माहिती सभागृहाला द्या, पाण्याच्या लेव्हल कळू द्या, त्यानंतर पुढील ठरवू, अशी भूमिका सभागृहाची असल्यामुळे अखेर परिपूर्ण फेरप्रस्ताव सादर करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. 

loading image
go to top