कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar Statement Develop Kolhapur like Jaipur

कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा विकास जयपूरसारखा करू, असा विश्‍वास नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दाखविला. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांना ‘कोल्हापूर’ आणि ‘मुंबई’चे पालकमंत्री पद मिळाल्याची घोषणा झाली. येथे त्यांनी पालकमंत्री म्हणून ही प्रतिक्रिया दिली.

मंत्री केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू झाल्यावर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केव्हा होणार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार या प्रश्‍नावर कोण होणार हे माहिती नाही, मात्र येत्या आठ दिवसांत पालकमंत्र्यांसह नव्या पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परिषद सुरू असतानाच पंधरा मिनिटांतच त्यांची कोल्हापूर आणि मुंबई जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती झाल्याची घोषणा झाली.

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून केसरकर म्हणाले, ‘मला करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद आहे. कोल्हापूर ऐतिहासिक आणि पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्‍वाचा जिल्हा आहे. जयपूर आणि कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक साम्य आहे. तेथेही मंदिरे, हेरिटेज वास्तू आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा विकास हा जयपूरसारखा करण्याची माझी कल्पना आहे. येथेही राजेराजवाडे आहेत. त्यांचा इतिहास आहे. ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. पालकमंत्री होण्यापूर्वीच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन गेलो आहे. त्यांच्याकडून जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने करायचा याबाबत चर्चा केली आहे. मध्यंतरी काडसिद्धेश्‍वर महाराजांचीही भेट घेतली आहे. करवीर निवासी अंबाबाईचे मंदिर आहे. याचा विचार करून पर्यटनक्षेत्रात कोल्हापूरचा विकास मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस आहे.’

मुंबईचेही पालकमंत्रिपद मिळाले आहे. यावर केसरकर म्हणाले, ‘तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. सुमारे साडेचार हजार किलोमीटरचे कॉंिक्रटचे रस्ते करण्याचा प्रस्ताव आहे. केंद्र शासनाने स्वच्छतेसाठी राज्याला १२ हजार कोटी दिले आहेत. नगरविकास मंत्री स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे तो विकास करणार आहे. याचबरोबर कोळीवाड्यासह मुंबईचा विकास करण्यावर भर राहणार आहे.’

लवकरच सीमोल्लंघन

सध्या मंत्री कमी आहेत. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मुंबई आणि कोल्हापूर अशा दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, लवकरच मुंबई किंवा कोल्हापूर एकच पालकमंत्री पद राहणार आहे. दोन्हीपैकी एक पद सोडावे लागणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार आहे. दसरा आला आहे तेथे अनेक गोष्टींचे सीमोल्लंघनही होणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.