100 वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचे नाव गाजवणारे दिनकर शिंदे

Dinkar Shinde, who made Kolhapur famous in the Olympics 100 years ago
Dinkar Shinde, who made Kolhapur famous in the Olympics 100 years ago

कोल्हापूर : भवानी मंडपातल्या स्तंभाकडं तो आता सवयीचा झाल्यामुळं कुणाचंही लक्ष जात नाही. त्यावरची कोल्हापूरचं नाव जगभर गाजवणाऱ्या खेळाडूंची नावं आता पुसट झालेली आहेत आणि आपल्या स्मृतीतून तर कधीचीच पुसली गेली आहेत. या सगळ्या नावांत पहिलं नाव आहे दिनकर रावजी शिंदे. बरोबर 100 वर्षांपूर्वी म्हणजे ऑगस्ट 1920 मध्ये अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये शिंदेंनी जो पराक्रम गाजवलेला होता तो आता कोल्हापूरकरांना आठवतही नाही. 

पहिलं महायुद्ध संपल्यावर पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धा बेल्जिअममधल्या अँटवर्पमध्ये भरवण्याचे निश्‍चित झाले. भारत तेव्हा पारतंत्र्यात असला तरी विविध खेळांच्या स्पर्धा भरवणाऱ्या हौशी संयोजकांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचे ठरवले. या सगळ्या धडपडीला त्यांनी सर दोराबजी टाटांची मदत मागितली. टाटांनी उत्साहाने ही जबाबदारी घेतली आणि मुंबईचे गव्हर्नर जॉर्ज विल्यमना भेटून त्यांच्यामार्फत या खेळाडूंना भारतातर्फे स्पर्धेत उतरण्यासाठी परवानगी मिळवली. गव्हर्नरने स्पर्धेआधी तयारी म्हणून एक महिना इंग्लंडमध्ये राहण्याचीही व्यवस्था करून दिली आणि एक प्रशिक्षकही मिळवून दिला. 
खेळाडूंच्या निवडीसाठी समिती तयार झाली आणि पुणे व मुंबई इथं निवड चाचण्या पार पडून भारतीय संघ तयार झाला. यात कोल्हापूरच्या शिंदेंसोबत बेळगावचे चौगुले, साताऱ्याचे दातार हे धावपटू आणि इतरही काही खेळाडू होते. आता मुख्य प्रश्‍न होता तो या स्पर्धेला जाण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा. टाटांनी स्वतःतर्फे काही रक्कम दिली, याशिवाय टिळक, बालगंधर्व, छत्रपती शाहू महाराज आणि उद्योगपती वालचंद यांनीही मदत केली. 
5 जून 1920 ला मुंबईतून बोटीने हा संघ इंग्लंडला रवाना झाला. या सगळ्यांचा हा पहिलाच समुद्र प्रवास होता. त्यामुळे त्यांना या प्रवासात अतिशय त्रास झाला आणि बोटीवर खाण्या-पिण्याचेही हाल झाले. 22 जूनला ही मंडळी इंग्लंडला जाऊन पोचली आणि लगेच त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. महिन्याभराच्या प्रशिक्षणानंतर 10 ऑगस्टला या पथकाने अँटवर्पकडे प्रयाण केले. 
ऑलिम्पिकचे उद्‌घाटन झाले आणि सामन्यांना सुरवात झाली. कुस्तीचे सामने 25 ऑगस्टपासून सुरू होणार होते. समोर प्रतिस्पर्धी म्हणून आधीपासून जोरदार तयारी केलेले देशोदेशीचे पैलवान होते आणि तुटपुंज्या सोयीनिशी सराव केलेले, अनेक हालअपेष्टा सहन करून अँटवर्पला पोचलेले विशीतले दिनकर शिंदे त्यांच्यासमोर आव्हान देत उभे होते. शिंदेंच्याविषयी फारशी माहिती सापडत नाही. कोल्हापुरात ते कुठल्या तालमीत जायचे, त्यांचे वस्ताद कोण याबद्दलचीही माहिती मिळत नाही. 
ऑलिम्पिकच्या रेकॉर्डवर त्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 1900 अशी नोंदवलेली आहे. म्हणजे ती अंदाजानेच लिहिलेली असावी. त्यांचं नावही "रणधीर' असं चुकीचं नोंदवलेलं आहे. 
1920 चे ऑलिम्पिक हे अमेरिकन कुस्तीगीरांचे होते. एकाहून एक तगडे अमेरिकन पैलवान आपल्या देशासाठी पदक जिंकायला शड्डू ठोकून तयार होते. कुस्त्यांचे सामने सुरू झाले आणि पैलवान एकमेकांना भिडले. शिंदे 60 किलो फेदरवेट फ्री स्टाईल गटात होते. 
शिंदेंचा पहिला सामना कुणाबरोबर झाला हे रेकॉर्डसवरून कळत नाही; पण तो ते सामना जिंकून पुढच्या फेरीत गेले हे निश्‍चित. दुसऱ्या फेरीत त्यांचा सामना झाला ब्रिटनच्या इनमन नावाच्या पैलवानाबरोबर. शिंदेंनी या पैलवानालाही अस्मान दाखवले. 
उपांत्य सामन्यात शिंदे आणि अमेरिकेचा गेर्सन यांच्यात लढत झाली. गेर्सन अतिशय तयारीचा पैलवान होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा त्याला बराच अनुभव होता आणि त्याने त्या आधी काही स्पर्धा जिंकलेल्याही होत्या. तरीही शिंदेंनी गेर्सनला चांगली लढत दिली; पण त्यांची तयारी कमी पडली आणि ते पराभूत झाले. 
आता शिंदेंना एक शेवटची संधी होती ती म्हणजे ब्रॉंझ पदकासाठीचा सामना. हा सामना होणार होता ब्रिटनच्या बर्नार्डबरोबर; पण दुर्दैवानं इथंही शिंदेंची हार झाली आणि त्यांना या गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 
परत आल्यावर पुढच्या आयुष्यात शिंदेंनी काय केलं, त्यांच्या पुढच्या पिढीतले सध्या कोणी कोल्हापुरात आहेत काय या प्रश्‍नांची उत्तरं मी शोधतोय. तुमच्याकडं काही वेगळी माहिती असेल तर जरूर कळवा. 
पदक जिंकता आलं नसलं तरी दिनकर शिंदेंचे कौतुक यासाठी करावेसे वाटते की, कोल्हापूरच्या आखाड्यातला हा पैलवान शतकापूर्वी जिद्दीनं सातासमुद्रापार गेला. अपुऱ्या तयारीनिशी तिथं त्यानं देशोदेशीच्या पैलवानांशी सामना दिला आणि कोल्हापूरचं नाव गाजवलं.

संपादन : सुजित पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com