
राज्यसभा रणधुमाळी, २४ वर्षांनंतर थेट मतदान, १९९८ ची पुनरावृत्ती होणार?
कोल्हापूर - महाराष्ट्रात तब्बल २४ वर्षांनंतर राज्यसभेसाठी थेट मतदान होत असून, यापूर्वी १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार का, असा प्रश्न राजकीय क्षेत्राला पडला आहे. त्या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय राम प्रधान यांचा अवघ्या अर्ध्या मताने पराभव झाला होता; तर सुरेश कलमाडी व विजय दर्डा हे काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यावेळी राज्यात काँग्रेसचा पराभव करून भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले होते. (Rajyasabha Election 2022 Live)
यात शिवसेनेचे ७३, भाजपचे ६५, काँग्रेसचे ८० तर तब्बल ४५ आमदार अपक्ष होते. त्या वेळी ‘राष्ट्रवादी’ची स्थापना झाली नव्हती. या पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता होती, त्यामुळे अपक्ष आमदारांना चांगलेच महत्त्व आले होते. या निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना, शिवसेनेकडून प्रीतिश नंदी व सतीश प्रधान यांना, तर काँग्रेसने नजमा हेपतुल्ला व राम प्रधान यांना उमेदवारी दिली होती.
हेही वाचा: संजय राऊत कोण, मला माहित नाही; राऊतांचं नाव घेताच उदयनराजे का संतापले?
काँग्रेसचे राम प्रधान त्या वेळी निवृत्त सनदी अधिकारी आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. त्यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी होती. त्यातून काँग्रेसचे कलमाडी व दर्डा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने मोठी चुरस झाली होती. आमदारांच्या संख्याबळानुसार काँग्रेसचे दोन व शिवसेना, भाजपचे प्रत्येकी एक उमेदवार पहिल्या पसंतीच्या मताने निवडून येणार होते; पण प्रत्यक्ष मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतांत महाजन व अपक्ष उमेदवार दर्डा विजयी झाले.
दुसऱ्या पसंतीच्या मतांत सेनेचे नंदी व तिसऱ्या पसंतीच्या फेरीत काँग्रेसच्या हेपतुल्ला व कलमाडी विजयी झाले. सेनेचे प्रधान व काँग्रेसचे प्रधान हे चौथ्या व पाचव्या फेरीतही मतांचा कोटा पूर्ण करू शकले नाहीत. भाजपच्या आमदारांची दुसऱ्या पसंतीची सर्व मते सेनेच्या श्री. प्रधान यांना मिळाल्याने ते अर्ध्या मताने विजयी झाले.
हेही वाचा: भाजपला धक्का बसू नये ही आमची इच्छा, संजय राऊतांचा टोला
‘भाव’ वधारला
२४ वर्षांपूर्वी झालेल्या या निवडणुकीची पुनरावृत्ती उद्या (ता. १०)च्या निकालात होणार की महाविकास आघाडी बाजी मारणार, याविषयी उत्सुकता आहे. काँग्रेसने राज्याबाहेरील दिलेला उमेदवार, अपक्ष आमदारांसाठी दोन्ही बाजूंनी सुरू असलेले प्रयत्न, त्यातून वधारलेला ‘भाव’ याचा विचार करता उद्याच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
Web Title: Direct Voting After 24 Years For Rajya Sabha Election 1998 Will Be Repeated Condition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..