esakal | कळंबा कारागृहात असंतोषाचा भडका 

बोलून बातमी शोधा

null

चक्क अधीक्षकांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे कळंबा मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी कारागृहात पार्टी, मोबाईल हॅण्डसेट सापडणे, गांजा सापडणे हे कारागृह राज्यभर गाजले आहे.

कळंबा कारागृहात असंतोषाचा भडका 

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : चक्क अधीक्षकांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे कळंबा मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी कारागृहात पार्टी, मोबाईल हॅण्डसेट सापडणे, गांजा सापडणे हे कारागृह राज्यभर गाजले आहे. काही वर्षापूर्वी शतपावली करण्यासाठी आलेल्या तुरुंगाधिकाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. आता थेट कारागृहातच अधीक्षकांवर हल्ला चढविण्याचा प्रकार झाल्यामुळे पुन्हा एकदा कळंबा कारागृह चर्चेत आले आहे. 

कळंबा कारागृह म्हणजे वादाचे केंद्र बिंदू ठरत आहे. नुकताच साप्ताहिक निरीक्षण फेरीवेळी अधीक्षक इंदुलकर चंद्रमणी यांच्यावरच एका कैद्याने हल्ला चढविला. याबाबत थेट जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कारागृहातील मोबाईल हॅण्डसेट प्रकरणात आजपर्यंत पाच गुन्हे दाखल झाले असून सुमारे वीस बंदी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. असे असतानाही अधीक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न थेट कारागृहात झाल्यामुळे तेथील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्‍यता आहे. 
दरम्यान, याबाबत अधीक्षक चंद्रमणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, कळंबा कारागृहातील गांजा, मोबाईल हॅण्डसेट, पार्ट्या, चिठ्ठ्या पोचविण्यावर कडक निर्बंध आणले आहेत. त्याचाही राग आता कर्मचारी आणि कैद्यांत आहे. त्याच्यामुळे हल्ल्याची घटना घडली आहे. याबाबत थेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्याची ही चौकशी होईल. 

मोबाईल हॅण्डसेट कारागृहात येऊ शकत नसल्यामुळे कैद्यांच्या चिठ्ठ्यांची देवाण घेवाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्याला निलंबित केले आहे. ड्यूटी संपल्यावर बुटाच्या सॉक्‍समधून चिठ्ठी कैद्याच्या नातेवाईकांपर्यंत पोचविणाऱ्याचा प्रकार प्रशासनाने उघडकीस आणला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत ही असंतोष असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

कारागृहातील गांजा, मोबाईल हॅण्डसेटची देवाण घेवाण बंद झाली आहे. ती होऊ नये, नियमभंग होऊ नये म्हणून प्रत्येक कर्मचारी आणि कैद्यांची बदली केली जाते. त्यांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डात पाठविले जाते. याचाही काहींना राग आहे. यापूर्वी वर्षानुवर्षे एकच ठिकाणी ठेवले होते. त्यांच्या कामात बदल केल्याचाही राग असल्यामुळेही हल्ल्याचा प्रकार झाला. 
- इंदुलकर चंद्रमणी, अधीक्षक, कळंबा कारागृह