Dr.Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेबांच्या मते लोकशाही यशस्वी होण्याच्या दृष्टीने या गोष्टी आवश्यक आहेत

‘लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारी असा आमूलाग्र बदल
Dr. Ambedkar jayanti
Dr. Ambedkar jayantiesakal

‘लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारी असा आमूलाग्र बदल कोणत्याही रक्तपाताशिवाय घडवून आणण्याचा मार्ग म्हणजे लोकशाही शासनव्यवस्था होय.’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीविषयी सांगतात. त्यांचे यासंदर्भातील विचार आजही प्रस्तुत आहेत. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त....

जयसिंह सुभाष ओहोळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या समाजात अभिप्रेत होता तो मूलगामी बदल. सामाजिक स्तरावर संरचनात्मक बदल घडवून आणण्याचा एक क्रांतिकारी मार्ग या दृष्टीने ते लोकशाहीकडे पाहतात. या व्यवस्थेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना न्याय, हक्क मिळण्याची अधिक शाश्वती असते.

बाबासाहेबांची लोकशाहीप्रती असणारी श्रद्धा केवळ पाश्चात्त्यांच्या लोकशाही शासनव्यवस्थेचे अंधानुकरण नव्हते. ते आपल्या लिखाणात प्राचीन व बुद्धकाळात गणराज्य म्हणजेच लोकशाहीचे अस्तित्व असल्याची पुष्टी देतात.

डॉ. बाबासाहेबांच्या मते लोकशाही यशस्वी होण्याच्या दृष्टीने या गोष्टी आवश्‍यक आहेत...

१) प्रबळ विरोधी पक्षः ही लोकशाहीची पूर्वअट आहे, असे ते मानत. सध्या मात्र विरोधी पक्षांना खच्ची करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते लोकशाहीसाठी घातक आहेत.

२) सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता : घटना समितीच्या सभेत २५ नोव्हेंबर १९४९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “भारतीय समाजात आज दोन गोष्टींची कमतरता दिसून येते आहे. त्यातील एक म्हणजे समता होय. राजकीय क्षेत्रात सर्वत्र समता असेल तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात असमानता असेल. अशा विरोधात्मक परिस्थितीत आपण किती काळ राहू शकणार आहोत? जर आपण लवकरात लवकर विरोधाभासाचे वातावरण दूर करू शकलो नाही, तर घटना समितीने परिश्रमपूर्वक तयार केलेली राजकीय लोकशाहीची इमारत जे विषमतेचे बळी ठरतील त्यांच्याकडून उखडली गेल्याशिवाय राहणार नाही.”

३) अल्पसंख्याकांची सुरक्षितता : लोकशाही यशस्वी होण्यासाठी अल्पसंख्याकांची सुरक्षितता आवश्यक आहे, असे डॉ. आंबेडकर यांचे मत होते. बहुमत अथवा बहुसंख्याक जोरावर अल्पसंख्याक असणाऱ्या समाजाची गळचेपी केली जाऊ नये.

४) विवेकी लोकमत : लोकशाही व्यवस्थेचा लोकमत हा मूलभूत गाभा असतो. बाबासाहेब लोकशाहीच्या यशासाठी विवेकी लोकमत आवश्यक असल्याचे मत नोंदवतात. लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांत काही लोकांवर समाजावर अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत असतात. मात्र त्या ठिकाणी त्या समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांची समाजाकडून दखल घेतली जात नाही, उलट इतर काही समाजांकडून आनंद व्यक्त केला जातो.

याबाबत बाबासाहेब जर्मनीत झालेल्या ज्यू धर्मीयांच्या छळाचे व काळे-गोरे लोकांच्यामधील भेदाचे उदाहरण देतात. हा तेथील लोकमतात सार्वजनिक विवेकबुद्धी जागृत नसल्याचा परिणाम होता, असे कारण बाबासाहेब देतात. डॉ. आंबेडकर म्हणतात की ‘सार्वजनिक विवेकबुद्धी याचा अर्थच असा की, जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस; मग तो त्या अन्यायाचा बळी असो वा नसो, अन्यायाच्या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो.

५) संविधानात्मक नीतीचे पालन : लोकशाही शासनव्यवस्थेत संविधानात्मक नीतीचे पालन होणे खूप महत्त्वाचे असते. शासनव्यवस्थेचे सर्व नियम, उपनियम, कायदेनिर्मिती क्रिया, केंद्र - राज्य अधिकार याबाबत सविस्तर तरतूद ही संविधानात केलेली असते. मात्र, अनेकदा सत्तारूढ पक्षाकडून बहुमताच्या बळावर या घटनात्मक नीतिमत्तेचे पालन न करता या संविधानिक मूल्यांची पायमल्ली होते.

६) नीतिमान समाजरचनेची आवश्यकता : संविधानात तरतूद असणाऱ्या मूल्यांची जपणूक लोकांकडून होण्यासाठी समाज हा नीतिमान असणे आवश्यक असते. समाज नीतिमान असेल तर समाजात घडणाऱ्या अनैतिक, अयोग्य घटनांत सामाजिक स्तरावरील योग्य-अयोग्य, नैतिक व अनैतिक अशा बाबतीतही समाजाची भूमिका योग्य असेल, असे बाबासाहेब सांगत.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत पदार्पण करत असताना भारतीय लोकशाहीची वाटचाल ही अध्यक्षीय लोकशाही पद्धतीकडे किंवा अल्पजन लोकशाहीकडे सुरू आहे, अशी टीका अलीकडे केली जाते. याकडे टीकेचा भाग म्हणून आपण दुर्लक्ष करू शकतो. मात्र, जागतिक लोकशाही निर्देशांकात आपल्या देशाच्या नामांकनात होणारी घसरण ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. ही स्थिती भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने निश्चित चिंतेची बाब आहे.

यावर उपाय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही यशस्वी होण्यास उद्‌भुत केलेले विचार अभ्यासले पाहिजेत. त्यांचे महत्त्व आज आणखी प्रकर्षाने जाणवते आहे.

(लेखक शिवाजी विद्यापीठात ‘रिसर्च फेलो’ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com