esakal | सांगलीत घंटा वाजणार, शाळा भरणार! शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत घंटा वाजणार, शाळा भरणार! शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

सांगलीत घंटा वाजणार, शाळा भरणार! शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात मार्चपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होणार असून, पुन्हा शाळांचे आवार बालचमूंच्या किलबिलाटाने गजबजणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी आज ‘पहिलीपासून पुढचे वर्ग पालकांच्या संमतीने सुरू करा’असे आदेश दिले. त्याचे शिक्षक संघटना, पालक, विद्यार्थी साऱ्यांनीच जोरदार स्वागत केले आहे. तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजेल.

कोरोना संकटाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडण्याच्या आधी म्हणजे १५ मार्चला जिल्ह्यात शाळा बंद करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. तेव्हापासून शाळा बंदच आहेत. काही दिवस वरचे वर्ग सुरू झाले, मात्र ते फार काळ चालले नाहीत. राज्य शासनाने अनेकदा शाळा सुरू करण्याचे सूतोवाच केले, मात्र दुसरी लाट, तिसरी लाट आडवी आली आणि निर्णय झालेच नाहीत.

हेही वाचा: दत्त मंदिरात अभिषेक घालून शेट्टींची जलसमाधी परिक्रमेला सुरुवात

आता जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची रोजची आकडेवारी ३०० पर्यंत खाली आली आहे. या स्थितीत अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ यांनी केली होती. त्यासाठी शिक्षण विभागावर दबावही होता. किमान दहावीचे वर्ग भरवा, यासाठी पालक आक्रमक झाले होते. त्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती बैठकीत चर्चा झाली आणि पालक, शाळा समितीची संमती असेल तर वर्ग भरवा, असे ठरले. त्यानुसार आज शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले.

शाळा व्यवस्थापन समितीने आधी बैठक घ्यायची आहे. त्यात शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव होईल. पालकांकडून त्यांना शाळा सुरू करण्यात हरकत नाही आणि ते आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत, असे संमतीपत्र घेतले जाईल. त्यानंतर शाळा सुरू करण्यात अडचण नाही, वर्ग भरवावेत, कोरोनाची पूर्ण काळजी घ्यावी.

- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी, जि. प.

loading image
go to top