esakal | राज्यातील सभासदांचे लक्ष चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीकडे; पाच मे ला संपणार मुदत
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील सभासदांचे लक्ष चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीकडे; पाच मे ला संपणार  मुदत

राज्यातील सभासदांचे लक्ष चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीकडे; पाच मे ला संपणार मुदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आणखी पुढे जाण्याची शक्‍यता आहे. पंचवार्षिक निवडणूक होऊन पाच वर्षे पूर्ण झाली असून, पाच मे रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणार आहे. मात्र, कोरोनामुळे सर्वसाधारण सभाही झालेली नाही आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबतही कोणतीच चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीत झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर या निवडणुकीकडे आता राज्यातील सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

विद्यमान संचालक मंडळाची मुदत महिन्यात संपण्यापूर्वी सर्वसाधारण सभा घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या हालचाली गेल्या महिन्यात सुरू होत्या. मात्र, याच दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि पुन्हा संचारबंदी जाहीर झाली. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सभा ऑनलाईन घेण्याचीही चर्चा झाली; पण त्याबाबतही कोणताच निर्णय झाला नाही. या पार्श्‍वभूमीवर मात्र सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, निवडणूक जाणीवपूर्वक लांबणीवर टाकली जात असल्याचे विरोधी सभासदांचे म्हणणे आहे. याउलट आम्ही कधीही निवडणुकीला आणि सर्वसाधारण सभेसाठी तयार आहोत, अशी भूमिका सत्तारूढ संचालक मांडत आहेत.

पाच वर्षातील घडामोडींवरून मोर्चेबांधणी

चित्रपट महामंडळाच्या इतिहासात गेली पंचवार्षिक निवडणूक कधी नव्हे एवढी गाजली. सर्वाधिक तब्बल 120 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यातून निर्माण झालेल्या राजकीय ईर्षेतून पुढे पाच वर्षे आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले. सर्वसाधारण सभा वादळी ठरल्या. वाढीव सभासद संख्येवरून आरोप-प्रत्यारोप झाले. "महा कला मंडल'च्या स्थापनेवरून वाद सुरू झाला. त्याच्याही पुढे जाऊन विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मंजूर झाला आणि तो पुन्हा नामंजूरही करण्यात आला. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी होणार आहे.

आम्ही कधीही सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीसाठी तयार आहोत. पाच मेनंतर धर्मादाय आयुक्तांकडे याबाबतचा प्रस्ताव महामंडळ पाठवणार आहे. त्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होईल.

- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, चित्रपट महामंडळ

Edited By- Archana Banage

loading image