esakal | ...''तोपर्यंत वीज बिल भरणार नाही''

बोलून बातमी शोधा

electricity bill kolhapur

महामोर्चाची पूर्वतयारी म्हणून गावा-गावांत सभा घेतल्या जात असून, येत्या काही दिवसांत त्याची तारीख जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले

...''तोपर्यंत वीज बिल भरणार नाही''

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : संचारबंदीच्या काळातील सहा महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ होत नाही तोपर्यंत बिला विरोधातील आंदोलन थांबणार नाही, असा इशारा वीज बिल भरणार नाही कृती समितीचे निवास साळोखे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. महामोर्चाची पूर्वतयारी म्हणून गावा-गावांत सभा घेतल्या जात असून, येत्या काही दिवसांत त्याची तारीख जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

श्री. साळोखे म्हणाले, "वीज बिल माफीसाठी रस्त्यावरची लढाई केल्यानंतर शासनातर्फे आंदोलनाची अंशतः दखल घेण्यात आली. मात्र, ही लढाई थांबलेली नाही. संचारबंदीच्या काळातील वीज बिल माफीसाठी शासनावर लोकांचा दबाव वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील तालीम, संस्था-संघटनांसह ग्रामीण भागात जनजागृतीच्या सभा सुरू आहेत. महामोर्चाची पूर्वतयारी त्यातून केली जात आहे." 

बाबा पार्टे म्हणाले, "जनजागृतीनंतर हायवे रोखण्यात येणार असून, महाराष्ट्र बंदची हाक दिली जाणार आहे. अधिवेशन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी शासनाने वीज कनेक्शन न तोडण्याची भूमिका घेतल्याचा आम्हाला संशय आहे."

बाबा इंदुलकर म्हणाले," वीज ग्राहक लाचार नाही. महावितरणने उपकाराची भाषा करू नये. संचारबंदीच्या काळात बिल भरलेल्या ग्राहकांना त्यांचे क्रेडिट दिले जावे. अन्यथा नवे आंदोलन उभारले जाईल."

पत्रकार परिषदेस जयकुमार शिंदे, ज्योतीराम घोडके, अॅड दत्ताजी कवाळे, अशोक भंडारे, बाबासाहेब पोवार-लबेकरी, स्वप्निल पार्टे उपस्थित होते.

 संपादन - धनाजी सुर्वे