राधानगरीतील हत्तीमहल परिसरात होणार "हत्ती सफारी'

"Elephant Safari" to be held at Hattimahal area in Radhanagar
"Elephant Safari" to be held at Hattimahal area in Radhanagar


राधानगरी : संस्थानकालीन ऐतिहासिक वास्तू असलेल्या हत्तीमहल परिसरात यंदाच्या पर्यटन हंगामात वन्यजीव विभागाकडून पर्यटकांसाठी "हत्ती सफारी'ची सुविधा सुरू होणार आहे. पर्यटकांसाठी हत्ती सफारीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. 
ऐतिहासिक हत्तीमहल परिसरातील सुमारे तीन एकर क्षेत्र सध्या जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे. हत्तीमहल वास्तूसह विश्रामगृह व विनावापर असलेली कर्मचारी निवासस्थाने वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन केंद्र निर्माण करण्याचे नियोजन ही वन्यजीव विभागाने केले आहे. त्यानुसार शाहूकालीन ऐतिहासिक वास्तू हत्तीमहलच्या सुधारणा व संवर्धनाचा आराखडा वन्यजीव विभागाने खासगी वास्तुविशारदाकडून तयार करून घेतला आहे. 
वर्षभरापूर्वीच आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून हत्तीमहल वास्तूच्या जतन व संवर्धनाचा प्रस्ताव प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून मंजूर झाला आहे. त्यासाठी 61 लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता पडझड झालेल्या भागाची नव्याने बांधणी आणि पडझडीचा धोका असलेल्या भागाचे मजबुतीकरण होणार आहे. त्यातून भग्नावस्थेत असलेल्या या वास्तूचा कायापालट होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1908 च्या सुमारास हत्तीमहलाची बांधणी करून घेतली. या वास्तूत हत्तीच्या निवाऱ्यासाठी स्वतंत्र खोल्या, मध्यभागी चौक, अशी रचना आहे. पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या या हत्तीमहल क्षेत्रातच आता "हत्ती सफारी'ने पर्यटनाला नवा आयाम मिळणार आहे. तर वन्यजीव विभागाकडे हस्तांतर होणाऱ्या विश्रामगृह व कर्मचारी निवासात आगामी काळात पर्यटकांसाठी निवास व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे. 
सध्या वन्यजीव विभागाने हत्तीमहल परिसराच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. तर हत्तीमहल वास्तू सुधारणेचे कामही प्रस्ताव मंजुरीनंतर सुरू करण्यात येणार आहे. 
राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी हत्तीमहल येथे "हत्ती सफारी' व हसणे लघुपाटबंधारे तलावात पर्यटकांसाठी बोटिंग सुविधेची संकल्पना पुढे आणली. त्यानुसार वन्यजीव विभागाने यंदाच्या पर्यटन हंगामात या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याची पूर्वतयारी केली आहे. या नव्या संकल्पनांतून राधानगरी व दाजीपूरच्या पर्यटनाला शाश्वत पर्यटनाची दिशा मिळणार आहे. 

"हत्ती सफारीसाठी' दोन हत्ती आणि प्रशिक्षित माहुतांची व्यवस्था राहील. आगामी दोन महिन्यांत हत्ती सफारी उपक्रम सुरू होईल. हसणे तलावात खासगीकरणातून पर्यटकांसाठी बोटिंग सुविधा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मागविण्याची कार्यवाही लवकरच होईल. हत्तीमहल वास्तूसह लगतचे क्षेत्र, विश्रामगृह वन्यजीव विभागाकडे हस्तांतरणास जलसंपदा विभागाने "ना हरकत' प्रमाणपत्र दिले आहे. केवळ कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मंजुरीची कार्यवाही बाकी आहे.'' 
- नवनाथ कांबळे, परिक्षेत्र वन अधिकारी वन्यजीव विभाग, राधानगरी 

"सकाळ'च्या चळवळीला बळ 
"सकाळ माध्यम समूहा'ने हाती घेतलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छता मोहिमेनंतर येथील पर्यटन विकासाला गती आली. जंगल आणि निसर्गाला धक्का न लावता येथे विकास कसा होईल, यावर "सकाळ'ने वारंवार लक्ष वेधले होते. विभागीय अधिकारी विशाल माळी यांच्या प्रयत्नातून हत्तीमहलची दुरुस्ती आणि हत्ती सफारी यामुळे "सकाळ'च्या चळवळीला बळ आले आहे.

अशी आहे हत्ती सफारी 
राधानगरी अभयारण्यात हत्ती सफारीचा मार्ग हत्तीमहलापासून उजवीकडे गेलेल्या जलसंपदा विभागाच्या जुन्या विश्रामगृहापासून म्हातारीचे पाणी रस्त्याने टॉवर जवळून सुरू होतो. पुढे गर्द जंगलात ही सफारी राहील. या परिसरात गव्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तिथून या जंगलातून ही सफारी वन्यजीव विभागाच्या कार्यालयाजवळ येऊन संपेल. त्यामध्ये राधानगरी "लक्ष्मी तलावाचे' दर्शन व जंगलाचा अभ्यास, असा प्राथमिक मार्ग राहील. त्यानंतर पर्यटकांच्या मागणीवरून सफारी मार्गात सुधारणा करण्यात येणार आहेत.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com