esakal | माशांची आवक 40 टक्‍क्‍यांनी घटली

बोलून बातमी शोधा

Fish Arrivals Fell By 40 Percent Kolhapur Marathi News

गडहिंग्लज येथील मटण मार्केटमध्ये चिकन आणि समुद्री माशांची आवक कमी झाली आहे. तुलनेत मागणी कायम असल्याने दर वधारले आहेत.

माशांची आवक 40 टक्‍क्‍यांनी घटली
sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येथील मटण मार्केटमध्ये चिकन आणि समुद्री माशांची आवक कमी झाली आहे. तुलनेत मागणी कायम असल्याने दर वधारले आहेत. ब्रॉयलर कोंबड्यांची आवक कमी झाल्याने चिकनचा वर्षभरानंतर दर पूर्वतत झाला आहे. माशांची सुमारे 40 टक्के आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. परिणामी, खवय्यांना मासे, चिकनसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. उन्हाळा संपेपर्यंत हीच परिस्थिती राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

वर्षभरापूर्वी बर्ड फ्ल्यूमुळे चिकनचा दर गडगडला होता. पोल्ट्रीधारकांना नाईलाजाने कवडीमोल दराने कोंबड्या विकाव्या लागल्या होत्या. कोरोनाच्या काळात हळूहळू दर सावरत गेला. गेल्या सहा महिन्यांपासून दीडशेच्या घरात किलोचा दर होता; मात्र दर चांगला मिळत नसल्याने पोल्ट्रीधारकांनी उत्पादन जेमतेम ठेवले. त्याचा परिणाम आवक कमी होण्यावर झाला. त्यातच कोंबडीच्या खाद्यात वापरल्या जाणाऱ्या सोयाबीन, मक्‍याचे दर वाढल्याने खर्च वाढला आहे. साहजिकच उपलब्ध कोंबड्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. जिवंत कोंबडीचा दर सरासरी किलोमागे 30 रुपयांनी वाढला आहे. गेल्या पंधरवड्यात किरकोळ विक्रीत किलोमागे 60 रुपयांनी दर वाढल्याचे विक्रेते समीर किल्लेदार यांनी सांगितले. 

गेल्या आठवड्याभरापासून कोकणातून येणाऱ्या समुद्री माशांची आवकही कमी झाली आहे. दर आठवड्याच्या तुलनेत सरासरी 40 टक्के आवक कमी झाल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. उन्हाळ्यात आवक कमी होत जाते. तसेच होळी सणामुळे कोळी बांधव होड्या बाहेर आणत नसल्यानेही आवक कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आवक कमी असली तरी मागणी कायम असल्याने सरासरी 20 ते 30 टक्‍क्‍यांनी दर वधारले आहेत. नदी, तलावातील कटला, राऊ आणि खेकड्यांची आवक स्थिर आहे. तुलनेत अंड्यांचे दर स्थिर असल्याचे विक्रेते महादेव शिवारे यांनी सांगितले. 

दर दृष्टिक्षेपात (रुपयात) 
अंडी शेकडा _ 440 
चिकन किलो _ 240 
मासे-सुरमई _ 1100 
पापलेट _ 1250 
बांगडा _ 260 
प्रॉंझ _ 500 
रावस _ 400 
कटला _ 260 
खेकडा _ 240 
राऊ _ 200 
टाकळी (आँध्रप्रदेश) _ 160.

संपादन - सचिन चराटी

kolhapur