esakal | कोल्हापुरात टेकऑफला कोरोनाचा फटका; प्रवासी संख्येवर परिणाम

बोलून बातमी शोधा

null

कोल्हापुरात टेकऑफला कोरोनाचा फटका; प्रवासी संख्येवर परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोविड महामारीचा फटका कोल्हापूर विमानतळालाही बसला असून ७५ टक्के प्रवासी घटले आहेत. अहमदाबाद विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. बेळगाव विमानसेवा आठवड्यातून केवळ चार दिवस सुरू आहे. दिवसांतून तीन वेळा विमानतळ, प्रवाशाची बॅग, विमान सॅनिटायझर केले जात आहे. कोविडमुळे नाईट लॅण्डिंगसाठी आलेल्या गतीलाही आता ब्रेक लागला आहे. कोल्हापूर विमानतळावर रोज सुमारे ४५० ते ५०० प्रवाशांची ये-जा होत होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे.

आज केवळ १००च्या आसपास प्रवासी ये-जा करीत आहेत. नव्याने सुरू झालेली अहमदाबाद विमानसेवा तर ३० एप्रिलपर्यंत प्रवासी नसल्याच्या कारणावरून बंद केली आहे. बंगळूर, हैदराबाद, तिरुपती, मुंबई विमानसेवा सुरू आहेत. बंगळूर केवळ चारच दिवस तर मुंबई तीन दिवस सुरू आहे. एकंदरीतच विमानतळाच्या उत्पन्नात घट झाली आहे. कोविड प्रतिबंधक उपाययोजनाही विमानतळावर काटेकोरपणे पालन कराव्या लागत आहेत. विमानतळ दिवसातून तीन वेळा सॅनिटायझर केले जात आहे. प्रवाशांसाठी सोशल डिस्टन्ससह इत-र उपाय योजना केल्या आहेत.

प्रवाशांना सोशल डिस्टन्स्‌ ठेवूनच बैठक व्यवस्था केली आहे. प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग केल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जात नाही. एवढंच नव्हे तर प्रवासी कोल्हापुरात आला तर त्यांना थेट होमक्वारंटाईन केले जाते. त्याचा डाटाही विमानतळ प्रशासनाकडे तयार आहे. देश-विदेशातील प्रवाशांवरच कोरोना महामारीचा परिणाम झाला आहे. त्याचाच फटका थेट कोल्हापुरातील विमानसेवेला ही बसला आहे.

नाईट लॅंडिंगला 'ब्रेक'च

विमानतळावर नाईट लॅंडिंग होण्यासाठी खासदार, पालकमंत्री यांनी विमानतळ प्राधिकरण, डीजीसीए यांच्या अधिकाऱ्यांबरोबर दिल्लीत बैठक घेतली. यात एप्रिलपर्यंत नाईट लँडिंगचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने, देशभरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाईट लँडिंगच्या प्रक्रियेलाही 'ब्रेक' लागला आहे.

विमानतळावर सुमारे २०० कर्मचारी आहेत. पैकी एक कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह असून, त्याच्यावरही यशस्वी उपचार झाले आहेत. संसर्गापासून दूर राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना एकत्रित बसू दिले जात नाही. प्रवाशांच्या बॅगेसह विमानही सॅनिटायझर केले जाते. देश-विदेशातील प्रवाशांचा फटका कोल्हापूर विमानतळालाही बसला आहे.