Kolhapur Flood - जीव धोक्यात घालून महावितरण कर्मचाऱ्यांची कामगिरी

काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरल्यानंतरच वीज पुरवठा पूर्ववत करणे शक्य होणार आहे.
Kolhapur Flood - जीव धोक्यात घालून महावितरण कर्मचाऱ्यांची कामगिरी

कोल्हापूर : मुसळधार पाऊस व रात्रीच्या अंधारात धोक्यात घालून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम केले आहे. पुराच्या पाण्यातून पोहत जात, टायरच्या वा बोटीच्या साह्याने तुटलेल्या वीज तारा जोडण्याचे व बिघाड दुरूस्तीचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरल्यानंतरच वीज पुरवठा पूर्ववत करणे शक्य होणार आहे.

कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापूराने वेढा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी उपकेंद्रे, वीज वाहिन्या, वितरण रोहित्रे पाण्यात असल्याने व वीज खांब जमीनदोस्त झाल्याने, वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला आहे. काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठा बंद आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सुरळीत वीजपुरवठयासाठी कसरत सुरू झाली आहे.

काल रात्री साडे नऊ वाजता कसबा बावडा परिसराचा वीज पुरवठा खंडीत झाला. या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या ३३/११ केव्ही शुगर मिल उपकेंद्राला ३३/११ केव्ही शिये वा पर्यायी असलेल्या ३३/११ केव्ही बापट कॅम्प या उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. दोन्ही उपकेंद्रावरून शुगर मिल उपकेंद्रासाठी निघणाऱ्या ११ केव्ही वीज वाहिन्या पूर्णत: पाण्यात गेल्याने बावडा अंधारात होते. या स्थितीत ३३/११ केव्ही सर्किट हाऊस उपकेंद्रावरून पर्यायी वीज पुरवठा जोडणे हा पर्याय होता. सर्वत्र पाणी असल्याने ते कठीण काम होते.

Kolhapur Flood - जीव धोक्यात घालून महावितरण कर्मचाऱ्यांची कामगिरी
Kolhapur Rain - राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची उसंत

महापुराच्या विळख्यात कसबा बावड्याचा अंधार दूर करण्यासाठी सात कर्मचारी सरसावले. तेरा मीटर उंचीचा वीजखांब, त्यावर जाऊन वीज भार घेण्यासाठी वीज तार जोडायची होती. अग्निशमन विभागाचे शिडी वाहन मदतीला आले. वीज तार जोडली गेली अन् अवघ्या दोन तासानंतर साडे सात हजार ग्राहक प्रकाशात आले. सहायक अभियंता प्रवीण सूर्यवंशी, जनमित्र विजय जाधव, सुनील चाटे, सचिन माने, रोशन पारधी, प्रणव पाटील, करण पायमल यांनी ही कामगिरी बजाविली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना शाबसकीची थाप दिली आहे. आमदार ऋतूराज पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

पुराच्या पाण्यात पोहत जाऊन तुटलेली वीज वाहिनी जोडून राधानगरीतील चांदेकरवाडीच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरणच्या वाळवा कक्षाचे जनमित्र सचिन पाटील व संतोष कपले पूर्ववत केला. फुलेवाडीच्या बालिंगा कक्षातील जनमित्रांनी बोटीतून प्रवास करीत पुराच्या पाण्यात उतरून ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिनीचा बिघाड दुरूस्त करून पाडळी गावठाणचा वीजपुरवठा सुरळीत केला. गडहिंग्लजमधील ११ नेसरी गावठाणातील उच्चदाब वीज वाहिनाचा वीज खांब उन्मळून पडल्याने वीज तार तुटली. ओढयात जाऊन वीज कर्मचाऱ्यांनी चार गाळयांचा वीज तार ओढून दुगुणवाडी, मासेवाडी, जांभुळवाडी व मंगणूर या गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला. जनमित्र उत्तम नाईक, विलास मुर्ती, श्रावण मटकर, झाकीरअली सय्यद, प्रभाकर पाटील, विजय कुंभार व रामदास गुरव यांनी ही कामगिरी केली.

सुरक्षेस्तव वीज पुरवठा बंद

शहरातील रुग्णालये , इमारती व इतर ठिकाणी पुराचे पाणी शिरल्याने ग्राहकांच्या विनंतीवरून वीज पुरवठा सुरक्षा कारणास्तव बंद ठेवला आहे. ग्राहकांनी पाणी ओसरल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी संपर्क साधावा, असे महावितरणने आवाहन केले आहे.

Kolhapur Flood - जीव धोक्यात घालून महावितरण कर्मचाऱ्यांची कामगिरी
कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी गुजरातवरून NDRF तुकड्या दाखल

पूरस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील ९ उपकेंद्रे (शेरीनाला, पाणुंब्रे, सिरशी, ताडवले, वसगडे, ब्रम्हनाळ, मर्दवाडी, कवठेपिराण,दुडगाव) बंद असल्याने ४२ गावे पुर्णत: बाधित तर २५ गावे अंशत: बाधित असून, ६० हजार ८६ ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ६१ वीजवाहिन्या पुर्णत: व ३६ अंशत: बंद तर २ हजार १८४ वितरण रोहित्रे बंद आहेत. उच्चदाब वीज वाहिनीचे ११ व लघुदाब वाहिनीचे २७ वीज खांब पडले आहेत. मांगले व शिराळा उपकेंद्राचा वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील १० उपकेंद्रे (नागाळा, दुधाळी, गांधीनगर,शिये, थावडे, कांचनवाडी, सातवे, सरूड, पाटपन्हाळा, आवडे मळा व राशिवडे) बंद असल्याने १११ गावे पूर्णत: बाधित तर ३४ गावे अंशत: बाधित असून, १ लाख १२ हजार ९६१ ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ७५ वीजवाहिन्या बंद तर १ हजार ६३६ वितरण रोहित्रे बंद आहेत. उच्चदाब वीज वाहिनीचे ६८ व लघुदाब वाहिनीचे १५१ वीज खांब पडले आहेत. वेतवडे, दिघवडे, बोलोली उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.

Kolhapur Flood - जीव धोक्यात घालून महावितरण कर्मचाऱ्यांची कामगिरी
दिलासा; सांगलीत कृष्णेची पाणी पातळी ओसरायला सुरवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com