esakal | सही मराठीत असल्यास मोजावे लागतात 500 रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

सही मराठीत असल्यास मोजावे लागतात 500 रुपये

भविष्यातील कायदेशीर कटकटीत हाच पाचशे रुपयांचा खर्च बॅंकेच्या बाजूने उभा राहतो.

सही मराठीत असल्यास मोजावे लागतात 500 रुपये

sakal_logo
By
- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कर्ज मंजूर झाले आहे, त्याची उचल करताना तुमची सही मराठीत असेल तर तुम्हाला पाचशे रुपयांचा खर्च आहे. पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेतले जाते. याबाबत काही बॅंकांकडून सक्ती केली जाते. भविष्यातील कायदेशीर कटकटीत हाच पाचशे रुपयांचा खर्च बॅंकेच्या बाजूने उभा राहतो. सही इंग्रजीत असेल तर हा खर्च टाळता येतो.

बॅंकांकडून कर्ज घेताना तुमच्या सह्या कोणकोणत्या कागदावर घेतल्या जातात, याकडे शक्यतो गांभीर्याने पाहिले जात नाही. सह्या घेणारा कर्मचारी किंवा अधिकारी केवळ एकूण सह्या किती आहेत याची मोजणी करतो. तितक्या सह्या झाल्या आहेत, की नाही याची खात्री करतो. बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनुभवानुसार कमी शिकलेलेच काय, शिकलेल्या व्यक्तीसुद्धा सर्व अर्ज वाचत नाहीत.

हेही वाचा: Chipi Airport Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री विमानतळावर दाखल

विशेष करून गृहकर्ज, वाहन कर्ज अशा कर्जांवेळी सर्व अर्ज इंग्रजीत असतात. अशा वेळी मराठी सही असल्यास भविष्यात काही कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागले तर हे हमीपत्र म्हणजे मला सर्व अटी समजल्या आहेत, असा अर्थ काढला जातो. म्हणून पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर तसे हमीपत्र घेतले जाते. हीच सही इंग्रजीत असल्यास हा पाचशे रुपयांचा खर्च वाचविता येतो.

काही बॅंकांमध्ये मराठीत सही असेल तरच पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर असे हमीपत्र घेतले जाते, अन्यथा इंग्रजी सही असेल तर घेतले जात नाही असा अनुभव असल्याचे सांगण्यात येते. बॅंक अधिकाऱ्यांनी स्वतःचे आणि बॅंकेचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती खरी असल्याचे स्पष्ट केले. बॅंकांकडून असे लिहून घेतले जात असल्याचे सर्रास आहे. मात्र याला कोणीही नकार देत नाही. ग्राहक पाहिजे त्या ठिकाणी सह्या देण्यास तयार असतात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: पत्नीचे चारित्र्य अन् अपत्याच्या संशयावरून 'आरव'चा खून

स्टॅम्पची गरजच नाही...

अंगठा किंवा मराठी सही असेल तर पाचशे रुपये अधिक खर्च होतात. कर्जाचे अर्ज इंग्रजीत असतात. त्याच्या संगणकावरील नोंदी (फिडिंग) सुद्धा इंग्रजीत असतात. त्यामुळे भविष्यात कायदेशीर बाबींना सामोरे जाताना मला इंग्रजी येत नाही. माझी सहीसुद्धा मराठीत आहे. त्यामुळे मला फसविले आहे, असे म्हणणे पुढे येऊ शकते. म्हणून त्याची काळजी घेऊन पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेतले जाते. इंग्रजीत सही असल्यास हे हमी पत्र घेणे टाळले जाते. प्रत्यक्षात स्टॅम्प घ्यायचीच गरज नाही. अंडरटेकिंग हे कोऱ्या कागदावर चालू शकते. स्टॅम्पला काहीच कायदेशीर आधार नाही.

- ॲड. अजित पाटील

loading image
go to top