esakal | सत्तेच्या हव्यासापोटी टीका करणाऱ्यांना येणारा काळच उत्तर देईल; महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार

बोलून बातमी शोधा

सत्तेच्या हव्यासापोटी टीका करणाऱ्यांना येणारा काळच उत्तर देईल; महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार
सत्तेच्या हव्यासापोटी टीका करणाऱ्यांना येणारा काळच उत्तर देईल; महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार
sakal_logo
By
युवराज पाटील -पुलाची शिरोली

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या गोठ्यापर्यंत सेवा देणारा गोकूळ हा जगात बाराव्या स्थानावर असणारा दूध संघ आहे. संघाला चौदा आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. संघाच्या कारभारावर शंका घेणे दुर्दैवी असून, सत्तेच्या हव्यासापोटी टीका करणाऱ्या विरोधकांना येणारा काळच वेळच उत्तर देईल. संघाची आर्थिक स्थिती भक्कम असून, आमदार पी. एन. पाटील, अरुण नरके आणि महादेवराव महाडिक या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सदैव उत्पादक सभासदाचे हीत संघाने जोपासले आहे. त्यांच्या पाठिंब्यावरच राजर्षी शाहू आघाडी विरोधकांचे चक्रव्यूह भेदेल असा विश्वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिला.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळ ) च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडीच्या हातकणंगले तालुक्यातील सभासद मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार सत्यजित पाटील - सरुडकर व माजी आमदार अमल महाडिक, गोकूळचे जेष्ठ संचालक अरुण नरके हे प्रमुख उपस्थित होते. येथील बुधले मंगल कार्यालयात मेळावा झाला.

अरूण नरके म्हणाले, उत्पादकाला गोकुळ कसा चालतो हे माहित आहे. संघाबाबत इतर कुणी माहिती देण्याची गरज नाही. गेल्या ४६ वर्षापासून संघात कार्यरत आहे. तेव्हापासून सत्ताधारी आघाडीच सत्तेत आली आहे. त्यामुळे यावेळीही सत्ताधारी आघाडीच सत्तेत येणार.

हेही वाचा- दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याची; 'ही' आहेत कारणे!

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, प्रत्येक महिन्याला तीन, तेरा आणि तेवीस तारखेला गोकूळचे वैभव जिल्हयाला कळते ; मात्र ते विरोधकांना दिसत नाही. यामुळेच ते गोकूळला गतवैभव मिळवून देऊ असे सांगत आहेत. परंतु गत वैभव मिळवून देण्यासाठी गोकूळचे वैभव गेलेच कुठे आहे.

गोकुळसाठी आपण हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याचे पालकत्व स्विकारले आहे सौ. महाडिक यांनी सांगितले. ज्यांनी स्वतः स्थापन केलेले दूध संघ बुडवले त्यांची मुले आता गोकूळच्या रिंगणात आहेत असा टोला संचालक रणजित पाटील यांनी विरोधकांना दिला.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण इंगवले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, सुरेश पाटील, दिलीप पाटील यांनी व ठरावधारक सभासदांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकूळचे संचालक व राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार रणजित पाटील, बाळासाहेब खाडे, अनुराधा पाटील, प्रताप पाटील - कावणेकर यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील ठरावधारक सभासद उपस्थित होते.

Edited By- Archana Banage