esakal | दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याची; 'ही' आहेत कारणे

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याची; 'ही' आहेत कारणे!
दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याची; 'ही' आहेत कारणे!
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग प्रथम नाकात व घशात झाल्यावर लक्षणे दिसताच क्षणी स्वॅब तपासणी व तातडीने उपचार घेणे, हाच कोरोनापासून मुक्तीचा मार्ग महत्त्वाचा ठरतो आहे. याद्वारे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्‍क्‍यांवर आहे. मात्र, अनेक जण लक्षणे दिसल्यावरही उपचार घेण्यास विलंब करीत आहेत. परिणामी, गंभीर बाधितांची संख्या १० ते ३० टक्‍क्‍यांवर पोचत आहे. यातून कोरोनाचा मृत्यूदरही वाढतो. कोल्हापुरातील कोरोनाचा रुग्णांच्या स्थितीचा अभ्यास केल्यावर यातून हे पुढे येत आहे.

‘सीपीआर’चे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना म्हणाले, ‘‘दुसऱ्या लाटेत फुफ्फुसाचा संसर्ग गंभीर होण्याचे प्रमाण लक्षणीय दिसत आहे. यात अनेक जण उशिरा तपासणीला गेल्याने प्रकृती गंभीर बनली. यात फुफ्फुसातील दहा वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये संसर्ग झाल्याचे दिसते. फुफ्फुसातील मांसपेशी (पॅरेनकयामा), फ्लोमन्री एम्बोलिझम संसर्ग (फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांतील गाठी), इंटर स्टेशीलय (श्‍वासनलिकेतील मांसपेशी होणारा संसर्ग), ब्रॉन्कायटीस (श्‍वासनलिकेचा संसर्ग) आदी भागांत कोरोना संसर्ग पसरतो. यावर वेळीच उपचार झाले नाही तर रुग्णांची प्रकृती गंभीर बनते. त्यामुळे लक्षणे दिसताच तातडीने तपासणी व उपचार करून घेणे हिताचे आहे.’’

सीपीआर’मधील नाक, कान, घसा विभागाचे डॉ. अजित लोकरे म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग पहिल्यांदा नाकात व घशात होतो, मग कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसात जातो. तिथे तो पसरला की फुफ्फुसांचे पंपिंग कमी होऊन श्‍वास घेण्यास त्रास सुरू होतो. ऑक्‍सिजन कमी पडतो. दम लागतो. तेव्हा रुग्णांची गुंतागुंत वाढते. रुग्ण गंभीर झाल्याने त्याला ऑक्‍सिजन द्यावा लागतो. काही संसर्ग वाढलेल्या गंभीर रुग्णांना रेमडेसिव्हिर द्यावे लागते. अशा गंभीर रुग्णांनाही पूरक औषधोपचाराद्वारे बरे करण्यात यश मिळाले आहे. ज्यांना अन्य गुंतागुंतीचे गंभीर आजार आहेत, तसेच उपचारास येण्यास विलंब झाला, त्यांच्यासाठी कोरोना जीवघेणा ठरतो आहे. लक्षणे दिसताच त्याच दिवशी स्वॅब तपासणी, बाधित असल्याचा अहवाल येताच तातडीने उपचार घेणाऱ्या व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. अशांचे प्रमाण ९८ टक्के आहे.’’

आयजीएम इचलकरंजीच्या डॉ. कीर्ती देशमुख म्हणाल्या, ‘‘लगेच उपचारांना येणाऱ्यांमध्ये सौम्य कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. अनेक जण लक्षणे दिसल्यावर घरगुती उपचारांत दिवस घालवितात. विलंबाने उपचारांना येतात. अशांची प्रकृती गंभीर झाली. त्यावरून सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे, अतिगंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना स्वतंत्र उपचार दिले जातात. यात वयस्कर व्यक्तींना (साठीपुढील) मधुमेह, फुफ्फुसाचा संसर्ग, न्यूमोनिया, हृदयविकार, रक्तदाब असे अन्य गंभीर आजार असल्यास त्यांना बरे होण्यास १५ दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागतो. यातही गुंतागुंत निर्माण झाल्यास जीवाचा धोकाही वाढतो. ग्रामीण भागात गंभीर रुग्णांचे प्रमाण १० ते ३० टक्‍क्‍यांवर आहे.’’

शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी म्हणाले, ‘‘लक्षणे दिसल्यावरही अनेक जण उपचारांशिवाय फिरत राहतात. यातून गंभीर समूह संसर्गाची शक्‍यता दिसते. अनेकदा बाधित लोकांच्या कुटुंबातील किंवा संपर्कातील व्यक्ती स्वॅब तपासणी करून घेणे टाळतात. तेही धोक्‍याचे ठरते. त्यातून एखादा बाधित व्यक्ती फिरत राहिल्यास कालांतराने लक्षणे गंभीर झालेली दिसतात. उपचारास विलंब होतो. त्यातून गुंतागुंत निर्माण होते. जीवाचा धोका निर्माण होतो.’’

डॉ. ए. बी. पाटील म्हणाले, ‘‘सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अशी लक्षणे दिसल्यावर परस्पर औषध घेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून चुकीची औषधे घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो. तरुण व महिलांचे प्रमाण ३५ ते ४० टक्के आहे.’’

कोरोना समुपदेशक माहेश्‍वरी पुजारी म्हणाल्या, ‘‘मला कोरोना होऊच शकत नाही, अशा भावनेत काही जण बिनधास्त आहेत. सोशल मीडियावरील उपचार वाचून त्याचा अवलंब करतात. प्रत्येकाची प्रकृती व वातावरण वेगळे असते. असे परस्पर स्वतः डॉक्‍टर असल्याच्या समजातून उपचार करून घेणे घातक ठरते. त्याने लक्षणे आणि पुढे गुंतागुत वाढते. प्रकृती गंभीर होते. अशा रुग्णांची वाढती संख्या दिसत आहे.’’

अभ्यासातील निष्कर्ष

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दोन महिन्यांत गंभीर होणारे एकूण रुग्ण ः १० ते ३० टक्के

२५ ते ५० वयोगटातील व्यक्ती लक्षणे दिसल्यापासून विलंबाने तपासणी व उपचार ः ४० ते ६० टक्के

गंभीर प्रकृती असली तरी निर्व्यसनी व कमी व्याधी असलेल्या व्यक्ती कोरोनामुक्त ः ६२ टक्के

गुंतागुंतीचे गंभीर आजार असलेल्या ५० वर्षांवरील व्यक्ती गंभीर ः ३५ टक्के

गंभीर आजारामुळे मृत्यू ः १० ते २५ टक्के

लक्षणे दिसताच दोन दिवसांत तपासणी व उपचार झाल्याने कोरोनामुक्त ः ९० टक्के

एकूण कोरोनाबाधित ६०,२२१

कोरोनामुक्त ५२,७१६

मृत्यू १,९८७

उपचारार्थी ५,५१८

गंभीर बाधित २८०

Edited By- Archana Banage