कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

आकस्मिक निधनाने कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे
कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

नागाव : फाउंड्री उद्योगातील भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक आणि झंवर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रामप्रताप झंवर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

रामप्रताप झंवर यांचा जन्म इचलकरंजी येथे त्यांच्या आजोळी ३ फेब्रुवारी १९३५ ला झाला. आष्टा (जि. सांगली) हे त्यांचे मूळ गाव. रामप्रताप झंवर यांचे माध्यमिक शिक्षण आष्ट्यातच झाले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिष्यवृत्तीवर त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी बी.ई मेकॅनिकल ही पदवी घेतली. कॅम्पस इंटरव्यूमध्ये दीडशे रुपये मासिक पगारावर त्यांनी किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड मध्ये नोकरी केली.

१९६६ मध्ये प्रोडक्शन इन्चार्ज या पदावर असताना त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी फाय फाऊंडेशनच्या पंडितराव कुलकर्णी यांनी त्यांना प्रेरणा दिली होती. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर रामप्रताप झंवर यांनी पंडितराव कुलकर्णी व श्रीकांत साखरपे अशा तिघांच्या भागीदारीत इंजीनियरिंग डेव्हलपमेंट हा उद्योग उद्यमनगर येथे सुरू केला. १९७० मध्ये याचे रूपांतर इलेकॉन्ट इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये झाले.

कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन
तेरी मेहरबानियॉं तेरी कदरदानिया! हिंगणगावचा 'रॉकी' वेधतोय लक्ष

कोल्हापूरची नामांकित कंपनी असा नावलौकिक इलेकॉन्टने मिळवला. त्यामुळे विविध राज्यात आणि शहरांमध्ये रामप्रताप झंवर यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. पण काही अंतर्गत व्यवसायिक कारणांमुळे भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये आर एस झेड या नावाने त्यांनी स्वतःच्या मालकीचे पहिले युनिट १९८२ मध्ये सुरू केले. केवळ अनुभवाच्या शिदोरीवर रामप्रताप झंवर यांनी नवीन वाटचाल सुरू केली. १९८५ मध्ये श्रीराम फाउंड्री या झंवर ग्रुपमधील नामांकित फौंड्री उद्योगाची सुरुवात झाली. बँकांचे आर्थिक सहकार्य, ग्राहकांशी असणारे ऋणानुबंध, पुरवठादार यांची मदत आणि रामप्रताप झंवर यांची महत्वकांक्षा या जोरावर झंवर ग्रुपचा अश्व चौफेर देऊ लागला. आष्टा या मूळ गावी आपला उद्योग असावा आणि तेथील लोकांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा यातूनच १९९० मध्ये आष्टा लाइनर्सची सुरुवात झाली.

सध्या झंवर ग्रुपध्ये सहा फौंड्री उद्योग व नऊ मशीनशॉपचा समावेश आहे. कागल - हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये झंवर ग्रुपने कस्तुरी या नावाने महत्वकांक्षी प्रकल्प उभारला आहे. याशिवाय उत्तरांचल येथेही या ग्रुपचा मोठा उद्योग सुरू आहे. आज या ग्रुपमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन कोल्हापूर फाउंड्री अँड इंजीनियरिंग क्लस्टर सी. आय. आय. एफ अशा अनेक औद्योगिक संस्थांवर त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कस्तुरीबेन, मुलगा नरेंद्र, सून सौ. नीताबेन, नातू नीरज व रोहन, नातसूना जिया व अंकिता, पंतू असा मोठा परिवार आहे.

कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन
कोल्हापुरात निर्बंध शिथिल करण्याबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य

आठवणींना उजाळा

बिझनेस आयडॉल ऑफ महाराष्ट्र या दैनिक सकाळ प्रकाशित कॉफी टेबल बुक पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर हे प्रमुख उपस्थितीत होते. १९ फेब्रुवारी २०२१ ला हॉटेल सयाजीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले, स्पर्धेपेक्षा स्वतःचा व्यवसाय वाढविण्यावर भर देणे आणि त्याचबरोबर दुसऱ्यांनाही मदतीचा हात देत त्यांना उभा करणे हा कोल्हापूरचा संस्कार आहे. आणि तो या क्षेत्रातील सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे. सकाळच्या या उपक्रमामुळे हा संस्कार आणखीन दूर पोहोचेल असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com