
कोल्हापूर : प्रदूषणमुक्तीसाठी २२५ कोटी; जीवनदायिनी पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी निधी
कोल्हापूर : जिल्ह्याची जीवनदायिनी पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी २२५ कोटींचा निधी दिला जाईल आणि येत्या तीन वर्षांत पंचगंगा निर्मळ व प्रदूषणमुक्त केली जाईल, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केली. तमाम कोल्हापूरकर आणि ‘सकाळ’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पुन्हा साथ देऊया, चला पंचगंगा वाचवूया’ मोहिमेंतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीचे स्वागत येथील पंचगंगा घाटावर झाले. त्या वेळी ते बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, हजारो हातांनी पंचगंगा घाटाची स्वच्छता करून ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘शहर आणि ग्रामीण भागाचा मिळून पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला असून, त्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. तीन वर्षांत पंचगंगा प्रदूषणमुक्त होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’’ ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, की दहा वर्षांपूर्वी ‘सकाळ''ने पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कोल्हापूरकरांना आवाहन केले आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, आमदार जयश्री जाधव यांच्या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत यांनी जलसंवर्धन प्रतिज्ञा दिली. ‘सकाळ''चे निवासी संपादक निखिल पंडितराव व उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांनी स्वागत केले.
Web Title: Funds De Pollution Panchganga Lifeblood District Kolhapur Satej Patil Hasan Mushrif
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..