esakal | गोकुळचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद ; 70 केंद्रांवर होणार मतदान

बोलून बातमी शोधा

गोकुळचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद ; 70 केंद्रांवर होणार मतदान
गोकुळचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद ; 70 केंद्रांवर होणार मतदान
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघासाठी रविवारी (ता. 2) सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान जिल्ह्यातील 70 केंद्रावर मतदान होईल. मंगळवारी (ता. 4) कसबा बावडा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे. एका केंद्रावर सुमारे 50 ते 55 मतदान होईल. कोरोनाबाधित ठरावदार शेवटच्या तासात पीपीई किट घालून मतदान करतील.

गोकुळसाठी महिनाभर धुरळा उडाला आहे. सत्तारूढ गटाकडून आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी तर विरोधात गटाकडून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे यांनी मोट बांधली आहे.

निवडणुकीला तात्पुरती रद्द करावी असा अजेंडा सत्तारुढकडून तर निवडणूक व्हावी यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेले. त्यानंतर विरोधकांना यामध्ये दिलासा मिळाल्यानंतर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडत राहिल्या. कोणी-कोणाला पाठिंबा दिला याचेही शक्तिप्रदर्शन होत राहिले. गोकुळमध्ये आपलीच सत्ता रहावे यासाठी सत्तारुढ आणि सत्तापरिवर्तन व्हावे, यासाठी विरोधकांनी जिल्हा पिंजून काढला आहे. कोरोना संसर्गाचे भयावह रुप असतानाही जिल्ह्यात गोकुळ निवडणूकीसाठी प्रचार, मेळाव्यातूनही शक्ती प्रदर्शन झाले. आज कसबा बावडा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे.

दृष्टिक्षेपात

संघाचे कार्यक्षेत्र - 12 तालुके

मतदार - 3656 (तीन मतदार मृत)

सर्वाधिक मतदार - 641 करवीरमध्ये

सर्वात कमी मतदार - 76 गगनबावडा

संचालक पदाच्या जागा - 21 (सर्वसाधारण गट 16, राखीव दोन महिला प्रतिनिधींसह पाच)

मतदान केंद्रांची संख्या - 70

मतदान कर्मचारी - 385

मतदानाचे ठिकाण ः तालुक्‍यातील ठरलेल्या केंद्रावर

मतमोजणी - 4 मे रोजी

मतमोजणी ठिकाण - रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृह

मतमोजणीसाठी टेबलांची संख्या - 18

मतमोजणी कर्मचाऱ्यांची संख्या - 90

Edited By- Archana Banage