esakal | गोकुळ रणांगण; सत्तारूढमधून विद्यमानांना संधी? आज पॅनेलची अधिकृत घोषणा

बोलून बातमी शोधा

गोकुळ रणांगण; सत्तारूढमधून विद्यमानांना संधी? आज पॅनेलची अधिकृत घोषणा
गोकुळ रणांगण; सत्तारूढमधून विद्यमानांना संधी? आज पॅनेलची अधिकृत घोषणा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सत्तारूढ गटातून सर्व विद्यमानांना पुन्हा संधी मिळण्याचे संकेत आहेत. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक, अरूण नरके यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्कामोर्तबही करण्यात आले.

दरम्यान, सत्तारूढ गटाच्या अधिकृत्त पॅनेलची घोषणा उद्या (२०) सकाळी ११ वाजता ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. यात उमेदवारी न मिळालेल्यांना तेथूनच अर्ज माघार घेण्यासाठी पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 'गोकुळ' च्या निवडणुकीसाठी २ मे रोजी मतदान होणार असून आज (२०) अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. या निवडणुकीत सत्तारूढ गटातून विद्यमान संचालक अरूण डोंगळे, विश्‍वास पाटील, आमदार राजेश पाटील, श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर हे बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादीचे संचालक विलास कांबळे यांनी परत फिरून सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला आहे. या पार्श्‍वभुमीवर सत्तारूढ गटातून विद्यमान सर्वच संचालकांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत.

महाडिक व पी. एन. पाटील यांच्यात सायंकाळी झालेल्या बैठकीत विद्यमान संचालक सोडून उर्वरित जागांवर कोणाला संधी द्यायची याविषयी चर्चा झाली. ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांनी यापुर्वीच निवृत्ती घेतल्याने त्यांच्या जागी त्यांचे पुत्र चेतन यांना उमेदवारी मिळणार आहे. विरोधी आघाडीत दिग्गज नेत्यांचा समावेश असून गेल्या निवडणुकीत या पॅनेलचे उमेदवारी राहिलेल्या व पहिल्या टप्प्यात या आघाडीतून उमेदवारी मिळेल अशी शक्‍यता असलेल्या काहींना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशा इच्छुकांनी सत्तारूढ गटांशी संधान साधले आहे. यापैकी किमान दोघांना सत्तारूढ गटातून संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

चार विद्यमान संचालक विरोधी आघाडीसोबत गेले तर एक जागा रिक्तच होती. यावेळी तीन जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे किमान सहा नव्या चेहऱ्यांना सत्तारूढ गटातून संधी मिळण्याची शक्‍यता आहे. विद्यमान १४ संचालक पुन्हा रिंगणात असतील यातील एक-दोन संचालकांना वगळून त्यांच्या जागी ते सांगतील त्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल.

मोठ्या घडामोडी शक्‍य

उद्या (२०) या निवडणुकीतील अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उद्याच पॅनेल जाहीर झाल्यानंतर मोठ्या घडामोडी होणार आहेत. दोन्ही पॅनेलमधून उमेदवारी डावलले काही जण इकडे तिकडे जाण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीत नाराजांना घेऊन तिसऱ्या आघाडी करण्याची चर्चा सुरू असली तरी सद्यस्थितीत ही आघाडी अशक्‍य आहे.

हे असतील नवे चेहरे

सत्तारूढ गटातून करवीरमधून भारत पाटील-भुयेकर किंवा रघू पाटील, दक्षिणमधून प्रताप पाटील-कावणेकर, राधानगरीतून हिंदुराव चौगले तर भुदरगडमधून धनाजी देसाई अशा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. चंदगडमधून धक्कादायक नाव सत्तारूढ गटातून असेल अशी चर्चा आहे.