esakal | गोकुळ रणांगण; सत्तारूढ गटाचे नेते उतरले मैदानात, संचालकांवर जबाबदारी निश्‍चित

बोलून बातमी शोधा

gokul election update responsibility of chairperson and leaders in kolhapur

‘गोकुळ’साठी २ मे रोजी मतदान होत आहे. सत्तारूढ गटातून तब्बल पाच संचालक बाहेर पडून विरोधी आघाडीला मिळाले आहेत.

गोकुळ रणांगण; सत्तारूढ गटाचे नेते उतरले मैदानात, संचालकांवर जबाबदारी निश्‍चित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक कोणत्याही परिस्थितीत होणारच असल्याने हा गड पुन्हा आपल्याकडेच राखण्यासाठी सत्तारूढ गटाचे नेते मैदानात उतरले आहेत. नेत्यांसह संचालक व काही प्रमुखांवर तालुकानिहाय जबाबदारी निश्‍चित केली आहे. आमदार पी. एन. पाटील स्वतः मैदानात उतरले असून, करवीरसह राधानगरी व गडहिंग्लज तालुक्‍याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. 

‘गोकुळ’साठी २ मे रोजी मतदान होत आहे. सत्तारूढ गटातून तब्बल पाच संचालक बाहेर पडून विरोधी आघाडीला मिळाले आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह खासदार संजय मंडलिक व बहुतांश आमदार विरोधी गटाबरोबर आहेत. दुसरीकडे सत्तारूढ गटाची मदार आमदार पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व संचालक अरुण नरके यांच्यावर आहे. पहिल्या टप्प्यात संचालकांनी सर्व तालुक्‍यांत फिरून ठरावदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. 

हेही वाचा - माशांची आवक 40 टक्‍क्‍यांनी घटली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्‍यता होती. तथापि, मंगळवारी (६) शासनाने काढलेल्या आदेशामुळे ही शक्‍यता दूर झाल्याने दोन्ही गटांनी प्रचाराला सुरवात केली आहे. कोरोनामुळे राजकीय सभांना बंदी असल्याने सभा, मेळावे न घेता वैयक्तिक भेटीवर दोन्ही बाजूंनी भर दिला जात आहे. सत्तारूढ गटाने मात्र तालुकानिहाय नेते व संचालकांवरच जबाबदारी सोपवली असून, ज्यांच्याकडे तालुक्‍याची जबाबदारी आहे, त्यांनी तालुक्‍यातच ठाण मांडून ठरावदारांशी संपर्क ठेवण्याचे काम दिले आहे. संचालकांनीही संबंधित तालुक्‍याच्या नेत्यांशी संपर्क साधून त्या तालुक्‍यात चार-पाच संचालकांनी जाऊन ठरावदारांना भेटण्याचे नियोजन सुरू आहे. या निवडणुकीसाठी २० एप्रिल हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.

दावेदारच रिंगणाबाहेर

शिरोळ व हातकणंगले तालुक्‍याला गेल्या निवडणुकीत प्रतिनिधित्व नव्हते. शिरोळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला. या वेळी अजित शहापुरे हे या दोन तालुक्‍यांतून प्रबळ दावेदार होते, पण त्यांचा अर्जच छाननीत उडाला. आता दादासो सांगावे यांना या तालुक्‍यातून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. श्री. सांगावे हे माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांचे समर्थक आहेत. 
 

सत्तारूढ गटाची जबाबदारी अशी

  • पी. एन. पाटील- करवीर, गडहिंग्लज, राधानगरी
  •  महादेवराव महाडिक- शिरोळ, हातकणंगले
  •  अरुण नरके- पन्हाळा, गगनबावडा
  •  सत्यजित पाटील-सरूडकर- शाहूवाडी 
  •  माजी मंत्री भरमू पाटील-चंदगड
  •  संजय घाटगे व समरजितसिंह घाटगे- कागल
  •  धैर्यशील देसाई- भुदरगड
  •  अध्यक्ष रवींद्र आपटे- आजरा