
लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘गोकुळ’मार्फत जनावरांना लसीकरण
कोल्हापूर : लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘गोकुळ’मार्फत जनावरांना मोफत लसीकरण करणार आहे. यासाठी ‘गोकुळ’ १ लाख डोस खरेदी करत आहे. यापैकी उद्या ५० हजार डोस मिळणार आहेत. संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रांवर लसीकरणाची सुविधा असून, लसपुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘जनावरांना लम्पी स्कीन आजारापासून दूर ठेवण्यासाठी ‘गोकुळ’ पुढाकार घेत आहे. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे काही जनावरे बाधित आहेत. तेथील जनावरांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्य ठिकाणीही उपचार केले जाणार आहेत. हातकणंगले तालुका व इचलकरंजी परिसर वगळता जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव कमी आहे.’’
दरम्यान, ‘गोकुळ’ने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. एखाद्या गावात लम्पी स्कीनने बाधित जनावरे आढळली तर शेतकऱ्यांनी तत्काळ नजीकच्या ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून बाधित जनावरे अन्य जनावरांपासून वेगळी करावीत. गोठ्याची साफसफाई, स्वच्छता करावी. गोचीड व माशांचा बंदोबस्त करावा. बाधित जनावरांविषयी संघाकडे संपर्क साधावा.