esakal | Gokul Update: गोकुळ मतमोजणी प्रकीयेला सुरुवात, पोलिस बंदोबस्त आणि कमालीची शांतता

बोलून बातमी शोधा

null

Gokul Update: गोकुळ मतमोजणी प्रकीयेला सुरुवात,पोलिस बंदोबस्त आणि कमालीची शांतता

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) मतमोजणी आज सकाळी 8 पासून सुरू झाली. मतमोजणी परिसरात अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत लोकांना निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेला निकाल इतरांना ऐकायला जावा, यासाठी स्पीकर लावण्यात आले होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  बाहेर न लावता केवळ मतमोजणी केंद्रापुरते मर्यादितच स्पीकर लावण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे पास आहेत अशांनाच मतदान केंद्राकडे सोडले जात आहे. पास शिवाय एकाही व्यक्तीला मतदान केंद्राकडे फिरकूही देत नाहीत. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर कमालीची शांतता आहे. 

गोकुळसाठी मतमोजणी ही राखीव गटापासून सुरु केली जाणार आहे. तर, सर्वसाधारण गटाची मतमोजणी या सर्व गटांची मोजणी झाल्यानंतर होणार आहे. इतर व राखीव गटातील मतांवरच एकूण मतांचा ट्रेंड किंवा गोकुळमध्ये कोणाची सत्ता येणार याचा अंदाज येणार आहे.  

गोकुळची मतमोजणी करताना सर्वप्रथम प्राथमिक मतमोजणी होईल. झालेली मते व मतपत्रिकेंचा हिशेब केला जाणार आहे. प्राथमिक मतमोजणी झाल्यानंतर मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे. दरम्यान, महिला राखीव गट, इतर मागासवर्गीय प्रवर्ग, राखीव व इतर प्रवर्गातील मतमोजणी सुरुवातील होईल. त्यानंतर सर्वसाधारण गटाची मतमोजणी होईल. एकूण 18 टेबलवर होणाऱ्या मतमोजणीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योग्यरित्या नियोजन केले आहे. 

* महिला राखीव गट : 

महिला राखीव गटाची मतमोजणी 1 ते 9 क्रमांकच्या टेंबलवर होईल. या टेंबलवर 50 मतांची मतमोजणी शीट असेल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका एकाच वेळी या टेबल क्रमांक 1 ते 9 टेबलवर विभागल्या जातील त्यानूसर मतमोजणी होईल. 

* इतर मागासवर्गीय प्रर्वग : 

या प्रर्वगातील मतमोजणी 10 ते 12 क्रमांच्या टेबलवर होईल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका या टेबलवर विभागल्या जातील आणि त्यानूसार मतमोजणी होईल. 

* भटक्‍या जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग : 

या प्रवर्गातील मतमोजणी 13 ते 15 क्रमांकाच्या टेबलवर होईल. 

* सर्वसाधारण प्रवर्ग : 

सर्व साधारण प्रवर्गातील मतमोजणी सर्वच्या सर्व 18 टेबलवर होईल. या 18 टेबलवर प्रत्येकी 25 मतांचे गठ्ठे दिले जातील. 25 मतांची मतमोजणी शीट असेल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका 25 मतांच्या गठ्ठ्याने एकाचवेळी सर्व 18 टेबलवर विभागल्या जातील आणि त्यानुसार मतमोजणी होईल. दरम्यान, इतर सर्व गटांची मतमोजणी झाल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील मतमोजणी होईल.

Edited By- Archana Banage