esakal | अडचणीत आहात? "गोल्ड लोन' हुकमी पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

अडचणीत आहात? "गोल्ड लोन' हुकमी पर्याय

अडचणीत आहात? "गोल्ड लोन' हुकमी पर्याय

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तातडीने पैशाची उपलब्धता तीही कोणाच्याही हातापाया न पडता, कागदपत्रांची गुंतागुंत न करता आणि मासिक हप्त्यांची किरकीर न करता म्हणजेच "गोल्ड लोन'. आजारीपणात तातडीने पैसे उपलब्ध होण्यासाठी, बॅंकेतील सिव्हिल खराब न होण्यासाठी, पैसे मिळण्यासाठी किंवा तात्पुरत्या गरजेसाठी "गोल्ड लोन' हा एक हुकमी पर्याय आहे. गोल्ड लोन, त्याची प्रक्रिया, फायदा, तोटा याबाबत थोडक्‍यात...

"गोल्ड लोन' म्हणजे काय ?

तुमच्याकडील सोन्याचे दागिने बॅंकेत गहाण (तारण) ठेवून त्या बदल्यात अधिकृत कर्जरुपाने पैसे उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेला "गोल्ड लोन' म्हणतात. गोल्ड लोन हे तुमच्याकडील सोन्यावरच घेतले जाऊ शकते. सोने ब्रॅण्डेड कंपनीतील पाहिजे, असा कोणताही नियम येथे नाही; मात्र सोन्याच्या शुद्धतेवरच कर्ज दिले जाते.

कोठे मिळते?

गोल्ड लोन हे कोणत्याही बॅंकेत, पतसंस्थेत, किंवा इतर खासगी मात्र सरकारमान्य फायनान्स कंपन्यांकडून दिले जाते. प्रत्येकाची प्रक्रिया एकच असली तरीही व्याजदर वेगळे असतात. साधारण एका दिवसात ही कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येक संस्था करत आहे. त्याची जाहिरात करून गोल्ड लोन दिले जाते. ते कोणालाही उपलब्ध होऊ शकते.

कसे घ्यावे?

गोल्ड लोनसाठी तुमच्याकडील सोने किंवा सोन्याचे दागिने घेऊन बॅंक, पतसंस्था, फायनान्स कंपनीत जावे. तेथे तुमच्या सोन्याची शुद्धता सराफांकडून तपासली जाते. येथे पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन फोटो बरोबर घेऊन जावेत. त्यानंतर केवळ दोन फॉर्म भरून घेतले जातात. तुमच्या सोन्याची रक्कम निश्‍चित केली जाते. साधारण एका दिवसात हे लोन (रक्कम) तुमच्या खात्यावर जमा केले जाते.

परतफेडीची पद्धत काय असते?

गोल्ड लोनला मासिक हाप्ते नसतात. वार्षिक एकच हप्ता असतो. महिन्याला व्याजही भरावे लागत नाही. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचे फारसे टेन्शन येत नाही. वर्षातून एकदाच सर्व रक्कम भरावी लागते. तसेच व्याजाचा दरही ज्या दिवशी सोने तारण (गहाण) ठेवलेले असते त्याचवेळी निश्‍चित असतो. काही कारणाने सर्व रक्कम मुदतीत भरता आली नाही तरीही तेच कर्ज (लोन) केवळ व्याज भरून पुन्हा नूतनीकरण करता येते. तसेच कर्ज घेतलेल्या दुसऱ्या दिवशीही परतफेड करता येते.

सोन्याची खात्री कशी केली जाते?

सोन्याचे दागिने तुम्ही गहाण देता तेव्हा त्याची सविस्तर माहिती पावतीवर लिहिलेली असते. सराफाच्या प्रमाणपत्रानेच त्याची शुद्धता पाहिली जाते. त्याची रक्कम ठरविली जाते. यातील एक पावती तुमच्याकडे येते, एक बॅंकेत राहते आणि एक सोन्यासोबत लॉकरमध्ये ठेवली जाते. त्यामुळे सोने सोडवून घेताना तुमचेच दागिने तुम्हाला मिळणार याची खात्री असते.

लोन किती टक्के मिळणार?

तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर आणि शुद्ध सोन्याच्या बिस्किटावर किंवा वळे (शुद्ध सोने) यावर कर्जाची रक्कम निश्‍चित होते. सोन्याच्या दराच्या साधारण 75-80 टक्के कर्ज तुम्हाला दिले जाते. हे सर्व कागदपत्रांद्वारे अधिकृत असते. कर्जाला असलेली व्याजाची रक्कमही तुम्हाला त्याचवेळी सांगितली जाते. तसेच वार्षिक व्याज किती होणार आहे याचीही कल्पना दिली जाते. 22 आणि 24 कॅरेटवर ही कर्जाची रक्कम ठरली जाते.

देशात कोठेही मिळेल लोन?

देशातील कोणत्याही ठिकाणी तुम्ही असल्यास त्या ठिकाणी गोल्ड देण्याची व्यवस्था बॅंकेकडून होते. केवळ तुम्ही त्या बॅंकेचे खातेदार (सेव्हिंग खाते) असणे आवश्‍यक आहे. तुम्ही आपल्या देशात कोणत्याही राज्यातून हे कर्ज घेऊ शकता. जेथे आर्थिक अडचणीत आहात तेथे तुम्हाला गोल्ड लोन मिळते; मात्र परदेशात गोल्ड लोन उपलब्ध होऊ शकत नाही. एनएफटी किंवा अन्य माध्यमातून तुमच्या खात्यावर लोनचे पैसे दिले जातात. तुम्ही कोठेही असला तरीही तुमच्या मूळ शाखेतून हे लोन मिळते व तुमच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. तुम्ही ते इतर कोणत्याही डिजिटल पद्धतीने घेऊ शकता.

स्त्रीधनावर गोल्ड लोन मिळेल?

स्त्रीधनावर (मंगळसूत्र, पाटल्या व इतर) गोल्ड लोन घेण्यासाठी पत्नी, आई, बहीण ज्यांचे दागिने आहेत त्यांची संमती लागते. त्यांच्या नावे इतर कोण कर्ज घेणार आहे त्यांना ना हरकतपत्र द्यावे लागते. एकट्या पतीने, किंवा मुलग्याने दागिने घेऊन बॅंकेत आल्यास त्यांना संमती पत्राशिवाय गोल्ड लोन दिले जात नाही.

"गोल्ड लोन'साठी खास स्वतंत्र व्यवस्था आहे. एका दिवसात ही प्रक्रिया केली जाते. बॅंक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र कक्ष असून, गरजूंची कागदपत्रे तातडीने पूर्ण केली जातात. या गोल्ड लोनमुळे बॅंकेचा सिव्हिल खराब होण्याची चिंता नसते. वार्षिक एकच हप्ता असतो. त्यामुळे खाते एनपीएमध्ये जाण्याची भीती नाही. नूतनीकरणही सोपे आहे. त्यामुळे आमच्या शाखेचे सहाय्यक सरव्यवस्थापक इलाही सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तातडीने गरज म्हणून गोल्ड लोन देत आहोत. कोविडसारख्या आजारावेळी अचानक पैसे लागतात. त्यावेळी गोल्ड लोन सोपे आणि टेन्शन कमी करणारे ठरते.

-अरुणा गडगे, क्रेडिट मॅनेजर, बॅंक ऑफ इंडिया, लक्ष्मीपुरी

Edited By- Archana Banage

loading image
go to top