esakal | दिव्यांग रिदमने घेतली फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

handicapped ridam pawar scxes story

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही 
गळे...’ या उक्तीनुसार जीवनात आलेल्या दिव्यांगत्वावर मात करीत सकारात्मक दृष्टीचा मंत्र देणारा राजारामपुरीतील रिदम पोवार याची खडतर वाटचाल सर्वांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे. अचानक आलेला ताप मेंदूत गेला आणि त्याचा परिणाम हात, पाय व तोंड लुळं पडण्यावर झाला. परिणामी, त्याच्या वाट्याला कायमचे दिव्यांगत्व आले.

दिव्यांग रिदमने घेतली फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी

sakal_logo
By
जगदीश खोडके

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) - ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही 
गळे...’ या उक्तीनुसार जीवनात आलेल्या दिव्यांगत्वावर मात करीत सकारात्मक दृष्टीचा मंत्र देणारा राजारामपुरीतील रिदम पोवार याची खडतर वाटचाल सर्वांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे. अचानक आलेला ताप मेंदूत गेला आणि त्याचा परिणाम हात, पाय व तोंड लुळं पडण्यावर झाला. परिणामी, त्याच्या वाट्याला कायमचे दिव्यांगत्व आले.

मॅनेंजायटीसने ग्रस्त असणाऱ्या रिदम पोवार याने बारावी उत्तीर्ण झाल्यावर ॲनिमेशनचे शिक्षण घेतले. रिदमला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मॅनेंजायटीसचा त्रास सुरू झाला, तो आजतागायत कायम आहे. चित्रपटसृष्टीत व्हीएफएक्‍स तंत्रज्ञान, ॲनिमेशन, टूडी, थ्रीडीचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रातच करिअर करण्याचे त्याने निश्‍चित केले. त्यासाठीच राजारामपुरीतील इमेज इन्स्टिट्यूटमधून त्याने थ्रीडी ॲनिमेशनचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. 

डॉ. मोनीश बाबरे निर्मित व विशाल चव्हाण दिग्दर्शित ‘करुणा शिवशंकरा’ हा मराठी चित्रपट, तसेच राहुल मोरे दिग्दर्शित ‘उदं गं आई उदं’ हा लघुपट व ‘देव म्हसोबा’ या सीडी फिल्मसाठी ॲनिमेशन व स्पेशल इफेक्‍टचे काम करण्याची संधी रिदमला मिळाली आणि तिचे त्याने सोने केले. या चित्रपटाद्वारे त्याने क्रोमा तंत्रज्ञान प्रथमच मराठीत आणले. ‘उधळला गुलाल जोतिबाचा’ या फिल्मचे टायटलिंग आणि एडिटिंगची (विविध शॉट्‌सना एकत्र जोडणे) जबाबदारी त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यासाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची गरज होती. म्हणून राजारामपुरीत व्हीएफएक्‍स नावाने त्याने स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. चित्रपटाच्या निमित्ताने त्याला दुबई, मॉरिशस, श्रीलंका या देशांत जाण्याची संधी मिळाली. 

रिदम म्हणतो, की ज्याला व्हीएफएक्‍स तंत्रज्ञान या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्याने किमान दहा वर्षे मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. शिवाय, स्क्रीप्टचे पूर्ण वाचन केल्यानंतरच तंत्रज्ञाला चांगले काम करणे शक्‍य होते. तुम्ही किती काम करता, यापेक्षा कसे करता, त्यावर किती मेहनत घेता 
यावर तुमचे मानधन आणि समाधान अवलंबून असते. निर्माता आणि व्हीएफएक्‍स संकलक यांच्यात करार होतो. या क्षेत्रात अभ्यासापेक्षा निरीक्षणशक्ती, प्रत्यक्ष कामकाज व वेळेची गुंतवणूक याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कलाकारांना प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरांत जावे लागते. काही जणांना परिस्थितीअभावी शिकता येत नाही. त्यामुळे कलानगरीत संस्था उभारून एकाच छताखाली प्रशिक्षण देण्याचे स्वप्न आहे. स्वतःचे प्रॉडक्‍शन हाउस तयार करण्याचा मानस असून, त्याद्वारे कोल्हापुरातील नवोदित दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी थिएटर उपलब्ध करायचे आहे. 
- रिदम पोवार, व्हीएफएक्‍स तंत्रज्ञ, कोल्हापूर