कोरोना उपचाराची  आरोग्य यंत्रणा कोलमडली 

कोरोना उपचाराची  आरोग्य यंत्रणा कोलमडली 
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. कोरोना गतीने फैलावत असताना उपचाराची यंत्रणा मात्र कोलमडली आहे. स्वॅब घेण्यापासून ते उपचाराला दाखल करण्यापर्यंत आणि उपचारापासून ते एखादा रुग्ण दगावल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करेपर्यंत सर्वत्रच वेटिंग आहे. स्वॅब तपासणीसाठी वेटिंग, अहवालासाठी वेटिंग, क्वारंटाईनसाठी वेटिंग आणि उपचारासाठी वेटिंग, सिरीयस झाल्यास ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरसाठी वेटिंग आणि एखादा रुग्ण दगावल्यास त्याला नेण्यासाठी शववाहिकेपासून ते अंत्यसंस्कारालाही वेटिंगच आहे. एखाद्याच्या मरणानंतरही वेटिंग संपेनासे झाले आहे. कोरोनाच्या रुग्णाच्या बाबतीत आता उपचारच राम भरोसे असल्याचे चित्र सध्या आहे. 

बेडसाठी वेटिंगवर 
सध्या सीपीआर हॉस्पिटल हाऊसफुल्ल आहे. येथे रुग्णांना बेड मिळत नाहीत. रविवारी सायंकाळी सहा वाजता येथील अपघात विभागात कोरोना पॉझिटिव्ह पाच रुग्ण ऑक्‍सिजन लावून बसविले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करायला बेडही शिल्लक नव्हता. बेड मिळायला उशीर होईल तसे यांपैकी काही रुग्ण व्हेंटिलेटरवरही जाऊ शकतात; पण व्हेंटिलेटरचाही तुटवडा आहे. 

उपचारासाठी परवड 
घटना रविवारची. कोरोना आहे की, नाही याची तपासणी करण्यासाठी स्वॅब दिलेल्या उपनगरातील एका रुग्णाला धाप लागली. श्‍वास घेण्यासाठी त्याला त्रास होऊ लागला. करायचे काय, असा प्रश्‍न नातेवाईकांना पडला. या दवाखान्यातून त्या दवाखान्यात नातेवाईकांचा प्रवास सुरू झाला. उपचारासाठी डॉक्‍टरांना विनविण्या सुरू झाल्या. खासगी डॉक्‍टरही उपचारासाठी दाखल करून घ्यायला तयार नाहीत. सीपीआर हाऊसफुल्ल, आयसोलेशन फुल्ल. तेथेही अहवाल आल्याशिवाय रुग्णालयात दाखल करून घेईनात. अहवाल मिळेना. नातेवाईकांची घालमेल सुरू होती. रविवारी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नातेवाईक घाबरले. पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ उडाली. अखेर सायंकाळी मोठ्या खर्चाची तयारी करून संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केले. 
घटना शनिवारची 
शहरातील दोन खासगी हॉस्पिटलमध्ये दोन महिला पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. शववाहिकेसाठी नातेवाईकांची धावपळ सुरू झाली. 
फायर ब्रिगेडला फोनाफोनी सुरू झाली. दोन तास झाले, शववाहिका आली नाही. शेवटी दोन तासांनी निर्णय झाला, एकाच शववाहिकेतून दोन्ही मृतदेह नेण्याचा; पण एका रुग्णालयात नातेवाईक आणि व्यवस्थापनांत वादावादी सुरू झाली. हा वाद टोकाला जाऊ लागला. अखेर त्या शववाहिकेतून एकाच महिलेचा मृतदेह तब्बल चार तासांनी नेला. दुसऱ्या रुग्णालयात मृत झालेल्या महिलेचा मृतदेह नेण्यासाठी तब्बल पाच तासांनी शववाहिका आली. दररोज हे चित्र शहरात घडते. 

स्वॅब तपासणी 
यंत्रणाही कोलमडली 

कोरोना आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आयसोलेशन, सीपीआर आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये स्वॅब द्यावे लागतात. जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या नातेवाईकांना स्वॅब देण्यासाठी नेले जाते किंवा स्वॅब तपासण्यासाठी नातेवाईक जातात. हे स्वॅब तपासणीसाठी दिवस जातो. केस पेपर काढणे, डॉक्‍टरांचा शेरा घेणे आणि त्यानंतर स्वॅब तपासणीला जावे लागते. प्रत्यक्ष स्वॅब तपासायला एक मिनिटही लागत नाही; पण प्रक्रियेला मात्र दोन तास, तीन तास आणि कधी कधी दिवसही लागतो. 

कंटेन्मेंट झोनचा फज्जा 
शहरात 150 हून अधिक ठिकाणी कंटेन्मेंट झोन केले आहेत; पण या कंटेन्मेंट झोनचा अक्षरक्ष: फज्जा उडाला आहे. येथे कोणतीच शिस्त नाही. कागदावरच कंटेन्मेंट झोनच आहे. काही ठिकाणी रुग्ण सापडल्यानंतर दोन दिवसांनी कंटेन्मेंट झोन होत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com