राजू शेट्टींनी केलं आवाहन अन् तरुणीने घेतला हा धडाकेबाज निर्णय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Highly educated girl preferred farmer husband kolhapur

आपण शेतकरी नवरा नको म्हणतो त्या वेळी आपला भाऊ आणि वडीलसुद्धा शेतकरी आहेत हे विसरून चालणार नाही, तेव्हा तोट्याच्या शेतीपासून पळ काढण्यापेक्षा आव्हानाला भिडू या असे भावनिक आवाहन दोनच दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते.

राजू शेट्टींनी केलं आवाहन अन् तरुणीने घेतला हा धडाकेबाज निर्णय...

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या पोरींनो शेतकरी नवरा नको असं म्हणू नका. शेती तोट्याची आणि बेभरवशाची असली तरीसुद्धा हे आव्हान आपण स्वीकारूया आणि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करूया. आपण शेतकरी नवरा नको म्हणतो त्या वेळी आपला भाऊ आणि वडीलसुद्धा शेतकरी आहेत हे विसरून चालणार नाही, तेव्हा तोट्याच्या शेतीपासून पळ काढण्यापेक्षा आव्हानाला भिडू या असे भावनिक आवाहन दोनच दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुमारी शिवलीला सूर्यवंशी या इंग्रजी घेऊन बी.एड. झालेल्या मुलीने कुमार सुभाष जाधव या शेतकरी तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

शेट्टी यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले

शिवलीलाचे वडील शिवाजी सूर्यवंशी (मु. पोस्ट काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) शिक्षक आहेत. ते सांगवडेवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी आपल्या मुलीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना मुलींचा निर्णय सांगितला व वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी साखरपुड्याला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले. यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी त्यांचे हे निमंत्रण स्वीकारले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल

सर्व मजकूर सध्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या फेसबुकसह अन्य सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवलीला आणि सुभाष यांची दोन्ही छायाचित्रेसुद्धा प्रसिद्ध केली आहेत. एखाद्या नेत्याने आवाहन केल्यावर त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे नेत्यांनी एकमेकांवर आरोप-टीका करताना, राजकरण करतानाही समाज कामासाठी पुढे आल्यास समाजात नक्कीच अनेक चांगल्या गोष्टी घडतील हे या उदाहरणावरून दिसून येते.